नगरभूमापन अधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:50+5:302021-07-16T04:18:50+5:30
सांगली : महापालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडाचा बाजार सुरू आहे. या प्रकाराला महापालिकेसोबतच नगरभूमापन कार्यालयाचा कारभारही तितकाच जबाबदार ...
सांगली : महापालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडाचा बाजार सुरू आहे. या प्रकाराला महापालिकेसोबतच नगरभूमापन कार्यालयाचा कारभारही तितकाच जबाबदार आहे. या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे कोट्यवधीचे भूखंड विकले जात आहेत. हा प्रकार थांबला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला.
साखळकर म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून चार ते पाच भूखंड विक्रीची प्रकरणे समोर आली. त्याविरोधात आम्ही आवाज उठविला. शहरातील हजारहून अधिक भूखंडाला अद्याप महापालिकेचे नाव लागलेले नाही. त्यापैकी काही प्रस्ताव नगरभूमापन कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. प्रस्तावात त्रुटी काढून नाव लावण्याच्या प्रक्रियेस विलंब केला जात आहे. त्याचा फायदा जागामालक घेत आहेत. अधिकारी काम प्रलंबित ठेवण्यासाठी तत्पर असतात. त्यांना शासन पगार देऊन कशासाठी पोसते. यापुढे अशा भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरासमोर बोंबमार आंदोलन करणार आहेत. कुपवाड येथील अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळील खुल्या भूखंडावर प्लॉट पाडून त्याची विक्री केली आहे. कुपवाडमधील मानधन कर्मचारी मकानदार यांची कारकीर्द संशयास्पद आहे. त्यांच्या कार्यकाळातील प्रत्येक कामाची चौकशी झाली पाहिजे. खुल्या भूखंडामध्ये गुंठेवारी करून त्याला गुंठेवारी प्रमाणपत्रे दिलेली आहेत. त्याला जबाबदार कोण आहे, त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी साखळकर यांनी केली.