आटपाडी तालुक्यासाठी उत्तम दर्जाचे कापूस बियाणे देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:39+5:302021-05-29T04:21:39+5:30
आटपाडी : आटपाडी तालुक्यासह संपूर्ण माणदेशात मोठ्या प्रमाणात कापूस पिकविला जातो. टेंभूचे पाणी भागात आल्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी कापूस ...
आटपाडी : आटपाडी तालुक्यासह संपूर्ण माणदेशात मोठ्या प्रमाणात कापूस पिकविला जातो. टेंभूचे पाणी भागात आल्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी कापूस घेता यावा म्हणून उत्तम दर्जाच्या आणि लांब धाग्याच्या कपाशीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही प्रयत्न करण्याचे आश्वासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना दिले.
माणगंगा फळबाग भाजीपाला उत्पादक व्यावसायिक संघ संचलित कृषी तंत्रनिकेतन आटपाडीस कुलगुरू डाॅ. पाटील यांनी भेट दिली. ते म्हणाले, किती क्षेत्रासाठी कापसाचे बियाणे लागणार, याची तातडीने माहिती गोळा करून आम्हाला कळविल्यास उत्तम बियाणे उपलब्धतेसाठी कंपन्यांकडे कृषी विद्यापीठ पाठपुरावा करेल. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करून त्यांना मार्गदर्शनही करण्यात येईल.
माणगंगा उद्योग समूहाचे संस्थापक आनंदराव पाटील म्हणाले, कापसाच्या प्रचंड उत्पादनासाठी आटपाडी तालुका प्रसिद्ध आहे. पण, गेल्या काही दिवसात बियाणांच्या फसवणुकीतून होणाऱ्या नुकसानीमुळे या नगदी पिकावर एकतर्फी बहिष्कार टाकला आहे.
यावेळी प्राचार्य विशाल यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सादिक खाटीक, ज्येष्ठ नेते श्रीरंगआण्णा कदम, आवळाईचे सरपंच बाबूराव जाधव, अभियंता उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, कौठुळीचे उपसरपंच नवनाथ कदम, शिवाजी फुले, शंकर ढोले, बापू फुले, नाथा बाड, संतोष बाड, भाऊसाहेब यमगर, अंकुश माईनकर, प्रा. योगेश सरगर, सचिन मिसाळ, सुहास पाटील, सदाशिव वाघमारे आदी उपस्थित होते.
चौकट
आटपाडीत डाळिंब संशोधन केंद्र करा : आनंदराव पाटील
आटपाडी तालुक्यासह माणदेशी भागाने जगप्रसिद्धी डाळिंब पिकविली आहेत. डाळिंबासह विविध फळांवर संशोधन करणारे संशोधन केंद्र राहुरी विद्यापीठाने आटपाडीत करावे, अशी मागणी आनंदराव पाटील यांनी केली.