बिकट वाट वहिवाट होणार का? कारण- राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:03 PM2018-06-08T23:03:42+5:302018-06-08T23:03:42+5:30
श्रीनिवास नागे
‘तुला नाही, मला नाही... घाल तिसऱ्याला’ या वाक्प्रचाराची प्रचिती घेऊन झाल्यानंतर काँग्रेस-राष्टÑवादी शहाणी झालीय. निदान तसं दिसतंय तरी. सांगलीत जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या उद्घाटनाला दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मांडीला मांडी लावून बसले होते. दोन्हीकडचे पदाधिकारीही मिरवत होते. पण महापालिका निवडणुकीतील आघाडीची घोषणा मात्र काही झाली नाही. आघाडी व्हावी (आणि होऊ नये यासाठीही!) यासाठी दोन्हीकडच्या मंडळींनी देव पाण्यात घातलेत म्हणे. त्यांची बिचाºयांची साफ निराशा झाली
महापालिकेत काँग्रेस सत्ताधारी; पण गटबाजीला ऊत आलेला. त्यातले काहीजण (खोबरं तिकडं चांगभलं म्हणणारे) फुटून ‘कमळाबाई’कडं गेलेत. एकमुखी नेतृत्वाचा अभाव. मदनभाऊंचा खमकेपणा कोणत्याच नेत्याकडं नाही. शिवाय पहिल्या फळीतले नेते आपापली संस्थानं सांभाळण्यात धन्यता मानणारे. महापालिकेच्या गडाला जबर हादरा देण्याची तयारी कमळाबाईनं सुरू केलेली असतानाही काँग्रेसवाले मात्र नेतृत्व कुणाकडं, याच विवंचनेत! राष्ट्रवादी महापालिकेत म्हटली तर सत्ताधारी, म्हटली तर विरोधक! तिच्या घड्याळाच्या सगळ्या किल्ल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या हाती. तिथंही दोन गट. त्यातले काहीजण तर कारनाम्यांत तरबेज असलेल्या ‘सोनेरी टोळी’तले. राष्टÑवादीच्या पुढाकारानं महाआघाडीची सत्ता आणण्यात ते जसं आघाडीवर होते, तसं सत्ता घालवण्यातही पुढं होते! त्यातच नेत्यांपासून पक्षापर्यंत सगळ्यांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!
या परिस्थितीत ‘सत्तातुराणं... भयं न लज्जा’ या वचनानुसार कसंही, काहीही करून महापालिकेवर झेंडा फडकवायचाच, या इराद्याने पेटलेल्या कमळाबाईची जिरवण्यासाठी काँग्रेसच्या हातावर राष्टÑवादीचं घड्याळ बांधलंच पाहिजे, हे काही नेत्यांना तरी पटलंय. वैयक्तिक उणीदुणी न काढता हेवेदावे, इगोंना वात लावली तर काहीच अशक्य नाही, पण...
आता गुरुवारच्याच जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या कार्यक्रमाचं बघा. जयंत पाटील यांना बोलावलं तर आपण येणार नाही, असं काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी आधीच जाहीर करून टाकल होतं. त्यानुसार ते आले नाहीत हं! (किती जणांच्या हे लक्षात आलं कुणास ठावे!) अर्थात त्यांच्या स्वत:च्या गटाचे नगरसेवक किती आणि महापालिका क्षेत्रात त्यांचे कार्यकर्ते किती हा (विरोधकांचा हं) नेहमीचाच चर्चेचा विषय! त्यांचे धाकटे बंधू विशाल पाटील यांनी तर पाठीत खंजीर खुपसण्याच्या जयंतरावांच्या हातखंडा कलेची जाहीर कार्यक्रमांत वाच्यता करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अगदी या कार्यक्रमातही ते बोलले की, माझ्यावर जयंतरावांचं प्रेम आहे, कारखान्याला ते मदत करतात, पण मदनभाऊ आणि प्रतीकदादा यांच्या पाठीत जयंतरावांनी खंजीर खुपसला. त्याच्या वेदना मलाही होत असल्यानं मी त्यांच्या विरोधात बोलतो.
नंतर जयंतरावांनी भाषणात विशाल यांना बेदखल केलं. पण जाताजाता म्हणालेच की, मदनभाऊंच्या शेवटच्या काळात त्यांना अनेकदा भेटलो. त्यांच्या त्यावेळच्या भावना सांगण्याची ही वेळ नाही...
खरंच जयंतरावांनी एकदा ते सांगावंच. मदनभाऊंच्या शेवटच्या काळात त्यांची जयंतरावांशी जवळीक वाढली होती. (ती काहींच्या डोळ्यांवरही आली होती.) त्यामुळं भाऊंना बाहेरच्यांसोबत आपल्याच माणसांनी कसा दगा दिला, हे जयंतरावांइतकं दुसरं कुणाला माहीत असणार? प्रबळ महत्त्वाकांक्षेतून मोठं होण्याची उबळ आलेल्या जवळच्या माणसांसोबत बाहेरच्या राजकीय वैºयांशी लढणाºया मदनभाऊंनी कदाचित जयंतरावांकडं मन मोकळं केलं असेलही! त्याआधीच्या आणि नंतरच्या काही निवडणुकांमध्ये (विधानसभा ते जिल्हा बँक व्हाया बाजार समिती) झालेला विरोध, महापालिकेत भाऊंचाच गट फोडून करण्यात आलेल्या कुरघोड्या यातून भाऊंना घरभेद्यांनी घेरलेलं स्पष्ट दिसत होतंच म्हणा!
काँग्रेससोबत आघाडीसाठी राष्टवादी अगतिक असल्यानंच जयंतरावांनी ‘किती वेळा तुमच्या दारात यायचं’ असा सवाल करत स्वतंत्र लढण्याचे इरादेही स्पष्ट केलेत. जयंतराव ज्यांना नकोत, त्यांना आघाडी नकोच आहे. याला जयंतरावांचा पूर्वेतिहास कारणीभूत असला तरी राजकारणातले अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या जयंतरावांना आगामी कसोटीचा काळ दिसत असल्यानंच ते काँग्रेसला चुचकारताहेत, हेही खरं.
जाता-जाता : प्रतीक पाटील यांनी लोकसभेसाठी, तर विशाल पाटील यांनी विधानसभेसाठी लांग चढवलीय. जयंतरावांनी मदतीचा शब्द दिला तरी ते ‘करेक्ट कार्यक्रम’ करू शकतात, याचा अनुभव प्रतीक यांनी घेतलाय. विशाल त्या अनुभवातूनच जयंतरावांना विरोध करत होते, मात्र आता तो मावळत चाललाय. कारण त्यांना स्वत:च्या तिकिटाची, जे येतील त्यांच्या मदतीची, निवडून येण्याची धास्ती दिसतेय. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात महापालिकेचा मोठा भाग येत असल्यानं, येत्या काळात वेळीच शहाणे होऊन जयंतरावांशी, विश्वजित-मदनभाऊ गटाशी त्यांनी जुळवून घेतलं, तर आश्चर्य वाटायला नको!
ताजा कलम : सिंगापूरच्या मॉलमधील घड्याळ चोरीफेम वजनदार नेते, पूर्वाश्रमीचे आकडेबहाद्दर आप्पा, गुंठेवारी किंग वगैरेंना कमळाबाईनं पवित्र करून घेतल्यानं आता काही ‘मोक्का’वालेही आशाळभूत नजरेनं पाहू लागलेत. ‘मोक्का काढतो, पक्षप्रवेश कर’ अशी खुली आॅफर कधी येतेय, याची ते वाट पाहताहेत म्हणे..!.
विश्वजित कदम आले तर...
पतंगराव कदम यांच्या पश्चात आ. विश्वजित कदम यांच्यावर आता सांगली महापालिकेचीही जबाबदारी आलीय. मागच्या निवडणुकीत त्यांनी मदनभाऊंमागं ताकद उभी केली होती. आताही जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या शिलेदारांना विश्वजित यांची साथ मिळेल, पण प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांचं काय? ते विश्वजित यांच्याशी कितपत जुळवून घेतील? काँग्रेसचं नेतृत्व करणार कोण? पक्षानं सुकाणू समिती स्थापन केली असली तरी दररोजचे स्थानिक पातळीवरचे निर्णय घेणार कोण? रसद कशी आणि कोण पुरवणार? या साºया प्रश्नांची उत्तरं शोधत काँग्रेसला वाट काढावी लागणार आहे. आणि हो, स्टेजवर आणि डिजीटल फलकावर फोटो लावला नाही म्हणून रूसून बसणारे नेते महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कितपत प्रयत्न करतील..?