टोल रद्दचे आश्वासन आता पाळणार का?
By admin | Published: November 5, 2014 09:43 PM2014-11-05T21:43:35+5:302014-11-05T23:44:47+5:30
जयंत पाटील : नव्या सरकारपुढे आव्हाने
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने एलबीटी आणि टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ते आव्हान त्यांना पेलावे लागेल. नवीन मुख्यमंत्री अभ्यासू अन् उत्साही आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टोकाचे आरोप केले. मात्र राज्य कारभार करताना काय अडचणी येतात, याची जाणीव त्यांना लवकरच येईल. स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा दिला आहे. विधानसभेत १0 तारखेला कोण कुठे बसेल हे स्पष्ट होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी केले.
शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करताना शिराळा नाका येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे अध्यक्षस्थानी होते. यल्लम्मा चौक, आष्टा नाका व शिराळा नाका येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले. शहरातील रस्त्यांसाठी अडीच कोटीचा निधी मिळाला आहे. हा निधी मिळविण्यासाठी अथक् परिश्रम घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीत शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व टिकाऊ पध्दतीने करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या परिपूर्तीसाठी प्रयत्न म्हणून रस्ते विकासाची कामे सुरु होत आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सुविधा देण्याचाही प्रयत्न आहे. त्यामुळे शहरासह वाळवा तालुक्याला राज्यातील सर्व सुविधांनीयुक्त अग्रेसर परिसर बनवू. रस्त्यांच्या दर्जाबाबत स्थानिक सत्ताधाऱ्यांनी दक्ष रहावे.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी, उद्यानाचे शहर म्हणून नवीन ओळख धारण करणाऱ्या इस्लामपूरमधील रस्ते उत्तम दर्जाचे असायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी एवढा निधी देऊन ठेवला आहे की, पाच वर्षे तो संपणार नाही. यावेळी शहाजी पाटील, खंडेराव जाधव, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, सौ. अरुणादेवी पाटील, विलास भिंगार्डे यांची भाषणे झाली.
माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक, बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका सौ. कविता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधी
इस्लामपूर शहरातील रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधी मिळाला आहे. यातूनच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते यल्लम्मा चौक, आष्टा नाका व शिराळा नाका येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले. हा निधी मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीचा एक भाग म्हणून रस्ते कामास प्रारंभ होत आहे.