पतंगरावांच्या पश्चात विश्वजित ‘बिनविरोध’ होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:41 AM2018-03-23T01:41:24+5:302018-03-23T01:41:24+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक आ. पतंगराव कदम यांचं ९ मार्चला निधन झालं. त्यांच्या जाण्यानं जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाल्याची भावना
श्रीनिवास नागे---कारण -राजकारण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक आ. पतंगराव कदम यांचं ९ मार्चला निधन झालं. त्यांच्या जाण्यानं जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाल्याची भावना तमाम राजकीय मंडळींची बनली. काँग्रेसचे कार्यकर्ते तर सुन्न झाले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सभांचे फड मारणाऱ्या, काँग्रेसची सूत्रं सांभाळणाºया या नेत्याच्या अचानक जाण्यानं आणखी एका चर्चेला आपसूकच सुरुवात झाली... की आता पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काय होणार?...
आणि ती अपरिहार्यता होती.
पतंगराव कर्करोगाशी झुंजत होते, उपचाराची शर्थ केली जात होती, या बातम्या वाºयाच्या वेगानं पसरत असतानाच ‘त्यांच्या पश्चात काय’ हा प्रश्नही अलगद समोर येत होता. या प्रश्नाची व्याप्ती त्यांच्या संस्थात्मक पसाºयापेक्षा राजकारणाला जादा व्यापणारी होती. कारण काही वर्षांपूर्वी जिथं कुसळं उगवत नव्हती, तिथं पतंगरावांच्या प्रयत्नानं ताकारी-टेंभू योजनांचं पाणी आलं आणि भिलवडी-वांगी म्हणजे आताचा पलूस-कडेगाव मतदारसंघ हिरवागार झाला. तिथं भारती विद्यापीठाच्या विद्याशाखांसोबत साखर कारखाने, सूतगिरण्या आणि सहकारी संस्थांचं जाळं विणलं गेलं. घरटी माणसं नोकरीला लागली. कैक संसार उभे राहिले. राहणीमान बदललं. संपन्नतेच्या महामार्गावरची वाटचाल सुरू झाली...
पतंगरावांचं हे योगदान कुणीच विसरू शकत नाही, अगदी विरोधकही! त्यामुळंच त्यांच्या निधनानंतर होणाºया रिक्त जागेवरील पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध निवडून द्यावं, असा मतप्रवाह पुढं आलाय. विशेष म्हणजे काँग्रेसमधील कदम गटाचे विरोधक असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनीच तसं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना करून या प्रश्नाची कोंडी फोडलीय.
खरं तर विश्वजित यांनी मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सांगलीतून उतरण्याची तयारी केली होती. मागील वेळी ते पुण्यातून लढले, पण मोदी लाटेमुळं यश मिळालं नाही. अर्थात पुण्यापेक्षा सांगली जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आणि संपर्क अधिक आहे. ‘मुलगी हवी हो’ अभियानापासून आताच्या सिंचन योजनांच्या पाण्यासाठी काढलेल्या मोर्चापर्यंत आणि जनआक्रोश मोर्चापासून दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बुलढाणा ते सांगली अशा ५६२ किलोमीटर काढलेल्या पदयात्रेपर्यंत अनेक घटना, आंदोलनांतून त्यांची नेतृत्वशैली, संघटन कौशल्य दिसून आलंय. भारती विद्यापीठाच्या कार्यवाहपदाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे.
सांगली महापालिकेच्या मागील निवडणुकीवेळी मदनभाऊ पाटील यांच्याशी कदम गटानं हातमिळवणी करून काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात विश्वजित यांच्या मुत्सद्देगिरीचा वाटा अधिक होता. मागील वर्षी झालेल्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत पतंगरावांचे थोरले बंधू मोहनराव कदम निवडून आले. विरोधी राष्टÑवादीचे मतदार जादा असतानाही हा चमत्कार घडला. त्याची रणनीती विश्वजित यांनीच आखून तडीलाही नेली होती.
आता पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीत त्यांनी उतरावं, असा विचार पुढं येत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे पतंगराव कदम कुटुंबियांचा या मतदारसंघाशी असलेला जिव्हाळा आणि आपुलकीचे संबंध. विश्वजित आणि सर्वच कदम कुटुंबियांनी ते जपल्यामुळंच पतंगरावांचं उर्वरित काम ते पूर्णत्वाला नेऊ शकतात, असं बोललं जातं. त्यांच्यामागं सहानुभूती आहे, जनभावना आहे, पण जनाधारही आहे. राजकारणात जनाधारालाच अधिक महत्त्व दिलं जातं.
आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुमनतार्इंना बिनविरोध निवडून द्यावं, यासाठी काँग्रेसकडून खुद्द पतंगराव कदम आणि भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेतला होता. काहींनी मुद्दाम विरोध केला होता, मात्र मुख्य पक्षांनी सुमनतार्इंनाच पाठिंबा दिला होता. तसाच निर्णय आताही व्हावा; सर्व पक्षांमध्ये दोस्ताना असणाºया पतंगरावांचे पुत्र विश्वजित यांना बिनविरोध निवडून देऊन आदर्श पायंडा पाडावा, अपेक्षा व्यक्त होतेय. विधानसभा निवडणुकीला केवळ वर्षभराचा कालावधी उरला आहे. इतक्या कमी कालावधीसाठी पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवणं, मतदान घेणं म्हणजे मनुष्यबळाचा आणि आणि पैशाच्या खर्चाचा अपव्यय ठरणार आहे. शिवाय शासकीय यंत्रणेवर ताण येईल, ते वेगळंच!लोकशाहीच्या तत्त्वांना काहीवेळा मुरड घालणं, सारासारविवेकाचा वापर करणं, हेच योग्य असतं, असं राजकीय मुत्सद्दी सांगतात, ते काय उगाच?
राष्टÑवादी पाठिंबा देणार
याबाबत राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे म्हणाले की, पतंगराव कदम यांचे निधन चटका लावणारे आहे. पलूस-कडेगाव येथील पोटनिवडणुकीत सर्वांनी विश्वजित कदम यांना पाठिंबा द्यावा. राज्यातील आगामी निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येतील, असे संकेत आहेत. विश्वजित कदम यांना राष्ट्रवादी पक्ष पाठिंबा देणार आहे. पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी विश्वजित यांना बिनविरोध निवडून देऊन आदर्श घालून द्यावा. भाजप काय करेल सांगता येत नाही, मात्र इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा.
भाजपचा निर्णय कधी?
पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, याविषयी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर पक्षाच्या कोअर कमिटीत चर्चा होईल. या कमिटीतील खासदार आणि चार आमदारांशी बोलून मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अंतिम निर्णय घेतील. पक्षाचा निर्णय अंतिम असेल. कदम यांचे पारंपरिक विरोधक असलो तरी सध्या मी अपक्ष नाही, तर एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. त्या पक्षाच्या अंतिम निर्णयासोबत माझ्यासह सर्वांनाच रहावे लागेल.