कुपवाड ड्रेनेजवरून महासभेत वादळी चर्चा
By admin | Published: April 20, 2016 11:46 PM2016-04-20T23:46:23+5:302016-04-20T23:46:23+5:30
उपमहापौर गटाचा आक्षेप : महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यास केला विरोध
सांगली : कुपवाड शहराच्या प्रस्तावित ड्रेनेज योजनेतील आॅक्सिडेशन पाँडसाठी जागा निश्चिती व खरेदीचे अधिकार आयुक्तांना देण्याचा ठराव गत महासभेत करण्यात आला होता. या ठरावाला उपमहापौर गटाने आक्षेप घेतला. आयुक्तांना अधिकार न देता महासभेनेच जबाबदारी पार पाडावी, अशी भूमिका घेतली, तर कुपवाडच्या नगरसेवकांनी मात्र काँग्रेसमधील गटबाजीचा योजनेवर परिणाम होऊ नये असे सांगत, गतवेळी केलेल्या ठरावाला पाठिंबा दिला.
महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत इतिवृत्त मंजुरीवेळी कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी जागा निश्चितीचे अधिकार महापौरांना देण्यात आले होते. पण ठराव करताना हे अधिकार आयुक्तांना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यावर नगरसेवक शेखर माने यांनी आक्षेप घेतला. सभागृहाने महापौरांना अधिकार दिले असताना आयुक्तांचा उल्लेख कसा काय आला? असा सवाल केला. महापौर हारूण शिकलगार म्हणाले की, मला अधिकार दिले असले तरी, शेवटी प्रशासनच त्याची अंमलबजावणी करणार आहे. आॅक्सिडेशन पाँडच्या जागेची निश्चिती जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासन करीत आहेत, असा खुलासा केला.
राष्ट्रवादीचे विष्णू माने म्हणाले की, हा विषय गत सभेत अजेंड्यावर घेऊन मंजूर केला आहे. त्यावर विरोधाची चर्चा योग्य नाही. ड्रेनेज योजनेत काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण करू नका. ही योजना पूर्ण झाली नाही, तर कुपवाडची जनता कदापीही माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यावर शेखर माने यांनी, तुमचे आणि आयुक्तांचे काही ठरले असेल तर आमचा विरोध नाही, असा चिमटा काढला. स्थायी सभापती संतोष पाटील म्हणाले की, ड्रेनेज योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला अधिकार दिले असावेत. प्रशासनावर विश्वास असल्याने महापौरांच्या ठरावास पाठिंबा आहे.
माजी उपमहापौर प्रशांत पाटील म्हणाले की, महाआघाडीच्या काळापासून कुपवाड ड्रेनेजची चर्चाच होत आहे. आता कुठे योजनेच्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. जीवन प्राधिकरणचा अभिप्राय घेऊन काही जागा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे महापौरांनी केलेला ठराव योग्यच आहे, असे मत त्यांनी मांडले.
महापालिकेकडील ठेकेदारांची नोंदणी व त्यांच्या फीवाढीवर सभेत चर्चा झाली. विष्णू माने यांनी, ठेकेदार समन्स घेऊनही कामे करीत नाहीत. अशा ठेकेदारांवर कारवाईचा निर्णय घ्या, अशी मागणी केली. माजी महापौर विवेक कांबळे यांनी, ठेकेदारांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, ठेकेदारांनी आयकरासह इतर कर चुकविले आहेत. महापालिकेकडे एकाच ठेकेदाराने दोनदा नोंदणी केली आहे. या नोंदणीत बोगसगिरी असल्याचा आरोप त्यांनी केला.
गटनेते किशोर जामदार म्हणाले की, २००७ पासून ठेकेदारांच्या नोंदणी फीमध्ये वाढ झालेली नाही. प्रशासनाने फी वाढीचे विषयपत्रच आणलेले नाही. याला कोण जबाबदार? समन्स घेऊनही दोन कामे प्रलंबित असतील, तर त्याची नोंदणी करू नये, असे मत त्यांनी मांडले. सदस्यांच्या सूचना व फी वाढीसह हा विषय मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)
कोट्यवधी रुपयांची जागा पडून
नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी, आरवाडे पार्कमधील कोट्यवधी रुपयांची जागा महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गेल्या एका वर्षापासून ही जागा ताब्यात घ्यावी, म्हणून आपण पाठपुरावा करतो. पण मालमत्ता विभागाकडे काहीच कागदपत्रे नसल्याने ही जागा ताब्यात घेतलेली नाही. या जागेची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. हवी असतील तर ती मी देतो. पण कोट्यवधी रुपयांची ही जागा कुणाच्या तरी घश्यात जाण्यापूर्वी ताब्यात घ्या, अशी विनंती त्यांनी केली. यावर महापौरांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.