वाईन पार्कच्या ‘नशेत’ उद्योगांची पिछेहाट
By admin | Published: December 2, 2015 12:03 AM2015-12-02T00:03:15+5:302015-12-02T00:38:01+5:30
चर्चा सांडगेवाडी वसाहतीची : द्राक्ष बागायतदार संकटात; उद्योजकांनाही मोठा फटका
आर. एन. बुरांडे -- पलूस तालुका आणि परिसरातील तालुक्यात खाण्यासाठी लागणाऱ्या द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष उत्पादन आणि बाजारपेठ यांचाही समतोल योग्य प्रमाणात साधला जायचा. शिवाय बेदाणा निर्मितीही मोठ्या प्रमाणात व्हायची, परंतु सर्व काही आलबेल असताना, १४ वर्षांपूर्वी अचानक सांडगेवाडी येथे वाईन पार्क उभारण्याचा ‘पेग’ परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिला गेला आणि येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी मात्र नशेत राहून भूईसपाट झाला. परिसरातील उद्योजकतेला मोठ्या पिछेहाटीला सामोरे जावे लागले.२००१ मध्ये राज्यातील लोकशाही आघाडी शासनाने महाराष्ट्राचे द्राक्ष प्रक्रिया धोरण जाहीर करुन द्राक्ष प्रक्रिया उद्योगास अनेक सोयी-सुविधा, सवलती जाहीर केल्या. पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील २५० एकर जागेवर कृष्णा वाईन पार्कची उभारणी करण्यात आली. परिसरातील द्राक्ष उत्पादकांना भव्य-दिव्य स्वप्ने दाखविण्यात आली. या स्वप्नांच्या नशेत येथील शेतकऱ्यांनी वाईन निर्मिती योजना राबविण्याचा निर्णय घेतला. द्राक्ष बागायतदारांनी खाण्याच्या द्राक्षाच्या बागा काढून त्या ठिकाणी वाईन निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या बागांची लागवड केली. द्राक्षांच्या खरेदीसंदर्भात करारही केले गेले. करार आणि द्राक्षाला मिळणारा भाव यामुळे वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्ष बागांच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. मुळातच महाराष्ट्रातील काही ठिकाणचा अपवाद वगळता, इतरत्र असणारे हवामान हे वाईन पिण्यासाठी योग्य असे नाही. यामुळे वाईनची मागणी मर्यादितच राहिली. तर अन्य देशातून आयात होणाऱ्या वाईनचा दर्जा राज्यात उत्पादित होणाऱ्या दर्जाच्या तुलनेत उच्च प्रतीचा असताना, राज्यातील वाईनला मोठी मागणी नव्हती. राज्यातील वाईनचे उत्पादन वाढले तरी, मागणीत वाढ झाली नाही. त्यामुळे वाईन पार्कमध्ये तयार होणारी लाखो लिटर वाईन पडून राहिली. त्यामुळे वाईन निर्मिती ठप्प झाली. त्यामुळे द्राक्षांची मागणी थांबली. यामुळे प्रसंगी कर्ज काढून खाण्याच्या द्राक्षबागा काढून वाईन द्राक्ष बागा उभारणारा शेतकरी मात्र पूर्णपणे हबकला ! अनेक शेतकऱ्यांचे तर दिवाळे निघाले. तर वाईन उद्योजक भव्य-दिव्य स्वप्नांच्या नशेतून शुद्धीवर आले, तेव्हा आपण देशोधडीला लागल्याची त्यांना जाणीव झाली.वाईन दारू नव्हे अन्न, लघु उद्योजकाचा दर्जा, उत्पादन शुल्क १०० टक्क्यांहून २५ टक्के, ५ हजार रुपयात वाईन विक्रीचा परवाना, बिअर बारच्या धर्तीवर विक्री परवाना, परवाना मिळवण्याची सोपी पद्धत, नाममात्र दराने भूखंड, वाईन इन्स्टिट्यूटची स्थापना, वाईन निर्मितीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, प्रयोगशाळा, द्राक्षप्रक्रिया उद्योगाकरिता बोर्डाची स्थापना, कर्ज सवलती, एक खिडकी योजना आदी सोयी सवलतींना भुलून येथील उद्योजक आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी या वाईन निर्मिती क्षेत्रात आले. परंतु केवळ दोन वर्षात त्यांच्या लक्षात आले की, या भूलभुलैय्यात आपण पूर्ण फसलो आहोत. पलूस तालुक्याच्या उद्योजकतेच्या वैभवाला मोठा फटका वाईन पार्कमुळे लागला.
सध्या जागतिक मंदीचा थेट फटका लघुउद्योजकांना बसू लागला आहे. अशावेळी या बंद असलेल्या वाईन पार्कमधील प्लॉट लघु उद्योजकांना मिळावेत, यासाठी गेल्या १० वर्षात कोणी प्रयत्न केले नाहीत. नुकतेच या सांडगेवाडी वाईन पार्कमधील इतर उद्योगासाठी असलेले निर्बंध हटविण्यात आल्याचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले आहे. तर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी असा कोणता निर्णय झाला नसल्याची माहिती दिली आहे. या दोघांच्या वक्तव्यामुळे परिसरातील उद्योजक मात्र संभ्रमात आहेत.
वसाहत ओसाड : स्वप्नांचाही चक्काचूर
सांडगेवाडी गावाजवळच कृष्णा वाईन पार्कची उभारणी झाल्याने येथे भव्य दिव्य रस्ते, मुबलक पाणी, वीज पुरवठा केंद्र, पथदिवे, भव्य मदर प्लांट, अद्ययावत यंत्रसामग्री, वाईन द्राक्ष वाणांची नर्सरी हे वैभव वाढले. येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि येथील परिसराचे भाग्य उजडेल, अशी आशा बाळगणाऱ्या लोकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आज गेल्या १० वर्षांपासून पडून असलेल्या कृष्णा वाईन पार्क अक्षरश: ओसाड झाला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. वाईन द्राक्षबागांचे क्षेत्रसुद्धा संपुष्टात आले आहे.
गट-तट बाजूला ठेवून औद्योगिक निर्बंध हटविणे गरजेचे
परिसरातील अनेक उद्योग बंद पडत असताना, तसेच कामगार आर्थिक संकटात सापडले असताना गेली अनेक वर्षे बंद असलेल्या कृष्णा वाईन पार्कवर असणारे सर्व निर्बंध उठवून उद्योजकांना इतर उद्योग सुरू करण्यासाठी पक्ष, गट तट बाजूला ठेवून प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.