लोकनृत्य स्पर्धेने सांगलीत जिंकली रसिकांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:04 AM2019-01-13T00:04:14+5:302019-01-13T00:07:22+5:30
येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुरू असलेल्या लोकोत्सवात शनिवारी लोकनृत्य व लावणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. बहारदार लोकनृत्य सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर आर्ट फेस्टिव्हललाही प्रारंभ झाला.
सांगली : येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुरू असलेल्या लोकोत्सवात शनिवारी लोकनृत्य व लावणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. बहारदार लोकनृत्य सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर आर्ट फेस्टिव्हललाही प्रारंभ झाला. लोकोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसाठी राज्यातून साठ कलाकारांनी आपली रंगावलीचे काम सुरू केले आहे.
प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लोकोत्सवाच्या दुसऱ्यादिवशी शनिवारी लोकनृत्य, लावणी व रांगोळी स्पर्धा झाल्या; तर आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात झाली.
शनिवारी सकाळच्या सत्रात लोकनृत्य व लावणी स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी बहारदार लावणी नृत्य सादर करून उपस्थितांना प्रभावित केले; तर लोकनृत्य स्पर्धेतही राज्यभरातील ३० हून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन टीव्ही कलाकार कल्याणी चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. परीक्षक म्हणून पूजा डांगे, दीपक बिडकर, सोनाली रजपूत, स्मिता पाटील, प्रदीप कांबळे, शुभांगी यादव यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लावणी स्पर्धा : प्रथम क्रमांक निकिता कांबळे (सातारा), द्वितीय शिवम मगदूम (कोल्हापूर), तृतीय हर्षाली बेलवलकर (सांगली), उत्तेजनार्थ सारिका भागवत, (म्हसवड), वसुंधरा माळी (सांगली) लोकनृत्य स्पर्धा : प्रथम यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, इस्लामपूर, द्वितीय रंगमल्हार कला अकॅडमी, सांगली, तृतीय युफोरिया डान्स अकॅडमी, इचलकरंजी, चतुर्थ मालतीताई वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर आणि पाचवा क्रमांक जिल्हा परिषद शाळा, सावंतपूर वसाहत.
यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, बी. आर. थोरात, तानाजीराव मोरे, डी. एस. माने, प्रशासकीय अधिकारी एम. के. अंबोळे आदी उपस्थित होते.
परिसरात कलात्मक सजावटीने रंग भरला...
लोकोत्सवानिमित्ताने परिसरात कलात्मक सजावट करण्यात आली आहे. भल्या मोठ्या मुग्यांची झाडावर चढत असलेली रांग, कपड्यांची झालर, सेल्फी पॉर्इंट यासह इतर सजावट करण्यात आली आहे. कलाविश्वचे प्राचार्य भाऊसाहेब ननावरे, लक्ष्मण थोरात, शशिकांत जगताप, सत्यजित वरेकर, रचना जाधव या शिक्षकांसह श्रीधर भट, अभिजित पाटील, महेश सुडके, श्रीराम यादव आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये लोकोत्सवाअंतर्गत शनिवारी राजस्थानी लोकनृत्य सादर करून युवतींनी उपस्थितांची मने जिंकली.