विजयाची माळ शेट्टी की मानेंच्या गळ्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:27 PM2019-04-24T23:27:27+5:302019-04-24T23:27:31+5:30
युनूस शेख लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : हातकणंगले लोकसभेच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ६९.४९ टक्केमतदान झाले. एकूण २ लाख ६९ ...
युनूस शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभेच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ६९.४९ टक्केमतदान झाले. एकूण २ लाख ६९ हजार २९५ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार १४0 मतदारांनी हक्कबजावला. २0१४च्या निवडणुकीत ७२.५२ टक्केमतदान झाले होते.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीविरुद्ध रणशिंग फुंकले होते. २०१४ च्या निवडणुकीत शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या बळावर विरोध मोडून काढत मतदारसंघातून २३ हजार ४४५ मताधिक्य घेतले होते. यावेळी शेट्टी यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांची ताकद होती. त्यामुळे मताधिक्यात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याविरोधात महायुतीकडून रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी भाजप-सेनेच्या पाच आमदारांची ताकद पणाला लागली होती. त्यामुळे येथे शेट्टींचे मताधिक्य रोखून धरण्याचा दावा युतीच्या समर्थकांकडून केला जात आहे.
मतदानावेळी राजू शेट्टी यांच्यासाठी जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे कामाला लागले होते. त्यांच्या समूहातील कामगार प्रत्यक्ष मतदान बुथमध्ये सक्रिय होते, तर कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर मतदारांची जुळणी करीत होते. माने यांच्यासाठीही भाजप-सेनेचे नेते, कार्यकर्त्यांसह मित्रपक्षांचे कार्यकर्ते कार्यरत होते.
सगळ्यांचीच गोची
खासदार शेट्टी गेल्या दोन निवडणुकीत विकास आघाडीला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढले. यावेळी त्यांनी काँग्रेस आघाडीशी घरोबा केल्याने, विकास आघाडीचे नेते त्यांच्यासमोर विरोधात ठाकले होते. धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने राष्ट्रवादीकडून लढल्या आहेत. आता माने कुटुंब शिवसेनेत गेल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याविरोधात आहेत. परिणामी, दोन्ही बाजूकडच्या सर्वांचीच गोची झाली होती.
अंडर करंटची चर्चा
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये शेट्टी-माने यांच्यातील लढतीचीच चर्चा रंगली. शेवटच्या दोन दिवसांत वंचित आघाडीची कपबशी, राजू शेट्टी नावाचे दोन उमेदवार, खासदारांनी काँग्रेस-आघाडीशी केलेली सलगी, शेट्टींनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचे उमटणारे पडसाद असे विषय समोर आले. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फक्त मोबाईल संदेशाची देवाण-घेवाण करून रान तापविल्याची चर्चा होती.