विट्यात आर्चीचे चाहते ‘सैराट’, चोरटे ‘झिंगाट’
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM2016-08-12T00:05:45+5:302016-08-12T00:05:45+5:30
गर्दीत तीन लाखांची रोकड लंपास : दुचाकीसह डझनभर मोबाईल गायब
विटा : येथे अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात ‘आर्ची’चे चाहते ‘सैराट’ झाले असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन ‘झिंगाट’ चोरट्यांनी चांगलाच हात मारला. गर्दीत कापडी पिशवी कापून चोरट्यांनी दोन लाख ५० हजार, तर एकाचा खिसा कापून ४० हजार अशी एकूण दोन लाख ९० हजारांची रक्कम लंपास केली.
यावेळी गर्दीत तरुणांचे १२ मोबाईल व एक दुचाकीही लांबविली गेली. गुरुवारी सव्वाबाराच्या सुमारास विटा पोलिस ठाण्यासमोरच या चोऱ्या झाल्या.
येथे अभिनेत्री रिंकू राजगुरू ऊर्फ आर्ची एका कार्यक्रमानिमित्त आली होती. कार्यक्रमस्थळ पोलिस ठाण्याजवळच आहे. रिंकू येण्यापूर्वीच हजारो चाहत्यांची गर्दी पोलिस ठाण्यासमोरच्या रस्त्यावर झाली होती. पोलिसही गर्दीला काबूत ठेवण्यासाठी बंदोबस्तात गुंतले होते. मानसिंग सहकारी बॅँकेच्या विटा शाखेतील शाखाप्रमुख राजेश नेने व शिपाई आनंदा रानमाळे सात लाख रुपयांची रक्कम कार्यक्रम स्थळाजवळ असलेल्या आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या विटा शाखेत जमा करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी गर्दीतून मार्ग काढत ते शाखेत पोहोचले. मात्र, तेथे कापडी पिशवी ब्लेडने कापून त्यातील दोन लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय या गर्दीत थांबलेल्या अजित शिवाजी कुरळे (रा. विवेकानंदनगर, विटा) यांच्या खिशातून रोख ४० हजार रुपयेही चोरट्यांनी लंपास केले.
रिंकूला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन लाख ९० हजार रुपयांच्या रकमेवर हात मारल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून, सहायक पोलिस फौजदार एन. बी. सावंत पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या गर्दीत चोरट्यांनी १२ मोबाईलसह एक दुचाकीही लंपास केली. (वार्ताहर)