ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्या, गावाची बदनामी थांबवा; सांगलीत बेडग ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
By संतोष भिसे | Published: July 24, 2023 04:22 PM2023-07-24T16:22:02+5:302023-07-24T16:23:30+5:30
बेडगसह पंचक्रोशीत कडकडीत बंद
सांगली : बेडग (ता. मिरज) येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर पोलिसांनी अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हे दाखल केल्याने हजारो ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. गुन्हे मागे घेण्याची व गावाची बदनामी थांबविण्याची मागणी केली. पंधरवड्यात गुन्हे मागे घेतले नाही, तर मुंबईला लॉंंग मार्च काढण्याचा इशारा दिला.
बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्यानंतर आंबेडकरी समाजाने मुंबईला लॉंग मार्च काढला होता. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेडग ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. ग्रामिण पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कारवाईचा निषेध केला. सकाळी १० वाजता गावातून हजारो स्त्री-पुरुष आंदोलक भगवे झेंडे हातात घेऊन निघाले. हजारो भगव्या झेंड्यांमुळे मिरज-सांगली रस्ता भगवामय झाला होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी बेडगपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे सभेत रुपांतर झाले. विविध नेत्यांनी भूमिका मांडत सरकारने अन्याय केल्याचे सांगितले. सरपंचांसह पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक आणि एकतर्फी असल्याने ते मागे घेण्याची आमची मागणी आहे.
शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली. राजकीय दबावाखाली दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
बेडगसह पंचक्रोशीत कडकडीत बंद
दरम्यान, आज बेडग गावासह पंचक्रोशीतील आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी आदी गावांनी बंद पाळला. बेडग ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या गावांतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ मोर्चामध्ये सहभागी झाले होते.