महिनाभरात ३१ जण आले इंग्लडमधून; १४ जणांचा काेरोना अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:54+5:302020-12-31T04:26:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित असली तरी इंग्लंडमधून येणाऱ्या लोकांची सध्या कडक तपासणी सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित असली तरी इंग्लंडमधून येणाऱ्या लोकांची सध्या कडक तपासणी सुरू आहे. १ डिसेंबरपासून सांगली जिल्ह्यात ३१ जण इंग्लंडहून आले असून यातील ग्रामीण भागात आलेल्या १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महापालिका क्षेत्रात आलेल्या १३ जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत.
इंग्लंडहून जिल्ह्यात ३१ प्रवासी आले. त्यात महापालिका क्षेत्रात १३ तर अन्य भागातील १८ लोकांचा समावेश आहे. तीन लोकांचा शोध अद्याप लागलेला नाही. जिल्हा परिषदेने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १८ पैकी १४ लोक व त्यांच्या ३८ नातेवाईकांसह ५२ जणांची तपासणी केली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप तरीही अन्य लोकांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत सतर्कता बाळगावी लागणार आहे.
लंडन व मुंबईतील त्यांचे अहवाल आले निगेटिव्ह
१३जणांची इंग्लंड व मुंबई विमानतळावर कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांची नावे जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनास कळविली आहेत. त्यानुसार त्यांना ७ दिवस क्वारंटाईन केले आहे. सर्वांची प्रकृती चांगली असून त्यांची पुन्हा कोरोना तपासणी होणार आहे.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?
विदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात नसून विमानतळांवर सध्या केवळ इंग्लंडहून आलेल्या लोकांची तपासणी करुन त्याबाबतची माहिती संबंधित राज्यांच्या आरोग्य विभागाला दिली जाते. राज्याच्या आरोग्य विभागाकडून पुन्हा जिल्हा प्रशासनाला माहिती दिली जाते. स्थानिक प्रशासन अशा लोकांना शोधून त्यांना क्वारंटाईन करुन चाचणी घेते.
इंग्लंडहून आलेल्यांची काटेकाेर तपासणी
जिल्ह्यात इंग्लंडहून आलेल्या प्रत्येकाची काटेकोरपणे तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांच्या अहवालावरही लक्ष ठेवले जाते. आमच्या अख्त्यारीत असलेल्या सर्व परदेशातून आलेल्या १४ लोकांसह त्यांच्या नातेवाईकांची तपासणी केली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली