मजरेवाडीचा कारभार सरपंचांविनाच
By admin | Published: January 21, 2015 11:21 PM2015-01-21T23:21:33+5:302015-01-21T23:58:53+5:30
पाच वर्षांपासून अशीच स्थिती : निवडणूक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; मागासवर्गीय समाज पदापासून वंचित
गणपती कोळी - कुरुंदवाड -मजरेवाडी (ता. शिरोळ) गावचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून सरपंचांविनाच चालू आहे. सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षित असताना प्रभागात मागासवर्गीय आरक्षण टाकले गेले नसल्याने या समाजाला आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे गेली पाच वर्षे गावचा कारभार उपसरपंचांवरच चालू असून, निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजाला सरपंचपदापासून वंचित राहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कुरुंदवाड शहरापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर कृष्णा नदीकाठी वसलेले अडीच हजार लोकवस्तीचे मजरेवाडी गाव आहे. गावामध्ये जैन समाजाची संख्या अधिक आहे. इतर समाजाची संख्या अत्यल्प आहे. समाजातील उपेक्षित घटकांनाही राजकारणात संधी मिळावी, यासाठी शासनाने मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिले आहे. त्यानुसार निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर केले जाते.
येथील नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत शासनाच्या धोरणानुसार २०११ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपद मागासवर्गीयांसाठी (बीसी) राखीव करण्यात आले. शंभरापर्यंत मतदार असलेल्या या समाजाला सरपंचपदाची संधी मिळणार असल्याने समाजात आनंद व्यक्त होत होता.
या समाजातून उमेदवार मिळविण्यासाठी गटनेत्याचीही उमेदवार चाचपणी झाली. प्रभाग क्रमांक दोनमध्ये हा समाज आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणात मागासवर्गीय आरक्षण काढण्यात आले नाही. त्यामुळे सरपंचपद मागासवर्गीयांसाठी आरक्षण असूनही प्रभागात आरक्षणच नसल्याने राजकीय गटनेत्यांची गोची झाली.
गावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राजेंद्र पाटील-यड्रावकर गट आहेत. गत निवडणुकीत स्वाभिमानी व कॉँग्रेस एकत्र येऊन यड्रावकर गटाविरोधात निवडणूक झाली. या निवडणुकीत यड्रावकर गटनेते लक्ष्मण चौगुले यांनी खुल्या प्रभागातून मागासवर्गीय उमेदवार दिला होता. मात्र, त्या उमेदवाराचा पराभव झाला, तर स्वाभिमानी व कॉँग्रेसला मागासवर्गीय उमेदवारच न मिळाल्याने व सरपंचपद मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने गेली पाच वर्षे गावचा कारभार सरपंचांविनाच चालू आहे.
या उपेक्षित समाजाला गावचे नेतृत्व करण्यासाठी शासनाने आरक्षण दिले. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रभागनिहाय आरक्षण चुकीच्या निर्णयामुळे या समाजाला आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने या समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सरपंचपद मागासवर्गीयांसाठी असल्याने प्रभागातही आरक्षण टाकणे गरजेचे होते. मात्र, प्रभाग आरक्षणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आरक्षण न टाकल्याने त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. समाजाच्या लोकसंख्येनुसार आरक्षण टाकण्यात येत असून, यावर कोणताही बदल करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आम्हाला काहीही करता आले नाही. या समाजावर मात्र अन्याय झाला आहे.
- नंदकिशोर पाटील,
गटनेता - स्वाभिमानी शेतकरी संघटना, मजरेवाडी.