Sangli: गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, कर्नाटकात विक्रीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:17 PM2024-10-24T18:17:10+5:302024-10-24T18:17:54+5:30

मोटारीतून पलायन केल्याने पीडितेची सुटका

Woman assaulted by giving gungi drug in Sangli, attempted to sell it in Karnataka | Sangli: गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, कर्नाटकात विक्रीचा प्रयत्न

संग्रहित छाया

सांगली : तासगाव तालुक्यातील एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे व्हिडीओ चित्रण करून तो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत गेले अनेक दिवस तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिला हुबळीत विक्रीसाठी घेऊन जात असताना पीडित महिलेने मिरजेत मोटारीचा दरवाजा उघडून पलायन करून सुटका करून घेतली.

दरम्यान, पीडितेने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फजल पटेल (वय ३६, रा. काळे प्लॉट, शंभर फुटी रस्ता, पाकिजा मशीदजवळ), अल्ताफ करीम (३५, रा. सांगली), फजलचा भाऊ अल्फाज पटेल (रा. काळे प्लॉट) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला ही तासगाव तालुक्यातील आहे. फजल याची महिलेशी ओळख होती. मार्च महिन्यात फजल याने तिला शंभर फुटी परिसरातील घरात बोलवले. शीतपेयातून तिला गुंगीचे औषध दिले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली.

ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावर आणि संशयित फजल याच्या अंगावर कपडे नव्हते. बाजूला संशयित अल्ताफ करीम हादेखील अर्धनग्न अवस्थेत मोबाइलमध्ये ‘व्हिडीओ’ चित्रण करत होता. जबरदस्तीने अतिप्रसंग केल्याचे लक्षात येताच संतप्त पीडितेने दोघांना जाब विचारला. तेव्हा फजल याने चाकू काढून पीडितेच्या गळ्याला लावला. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुझ्या मुलाला आणि नवऱ्याला मारून टाकीन अशी धमकी दिली.

जुलै महिन्यात फजल याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. सप्टेंबर महिन्यात पुन्हा फोन करून पीडित महिलेला सांगलीत बोलावून घेतले. तिला एका लाल रंगाच्या मोटारीत बसण्यास सांगितले. तिने मोटारीत बसण्यास नकार देताच, तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिला मोटारीत बसली. फजल याचा भाऊ अल्फाज मोटार चालवत होता, त्याच्या बाजूला अल्ताफ करीम हा बसला होता.

सांगलीतून निघाल्यानंतर फजल, ‘आपण हिला हुबळीला विकूया, हिच्या किडन्या आणि इतर अवयव विकून भरपूर पैसे मिळतील’ असे म्हणाला. ते ऐकून पीडिता खूप घाबरली. मोटार मिरज रेल्वे स्थानक परिसरात थांबल्यानंतर फजल हा मोबाइलवर बोलत मोटारीतून उतरला. फजल मोबाइलवर बोलण्यात मग्न असल्याची संधी साधून पीडितेने मोटारीचा दरवाजा उघडून तेथून पलायन केले.

पलायनानंतरही वारंवार धमकी

पीडित महिलेने पलायन केल्यानंतर संशयितांनी तिला वारंवार फोन केला. तिला आणि तिच्या एका मैत्रिणीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने पोलिसांत धाव घेतली. तिचा जबाब नोंदवून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिघांचा शोध सुरू आहे.

Web Title: Woman assaulted by giving gungi drug in Sangli, attempted to sell it in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.