सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:46+5:302021-03-28T04:25:46+5:30
सांगली : महापालिकेत बदली कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेने शनिवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या ...
सांगली : महापालिकेत बदली कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेने शनिवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्वच्छता मुकादम त्रास देतो व त्याच्या इच्छेप्रमाणे न वागल्याने कामावरून काढून टाकल्याचा त्यांचा आरोप होता. रुक्मिणी किसन पाटील (वय ४३, रा. गांधी हायस्कूलजवळ, विठ्ठलनगर) असे त्या महिलेचे नाव असून शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
अधिक माहिती अशी की, आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुक्मिणी पाटील या महापालिकेकडे बदली सफाई कामगार म्हणून कामास आहेत. स्वच्छता मुकादम शशिकांत कांबळे तसेच स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे या त्यांना त्रास देत असल्याचे निवेदन महापालिका आयुक्त व शहर पोलीस ठाण्यास सादर केले आहे.
मुकादम कांबळे हा वारंवार विनयभंग करतो. पैशांची मागणीही करण्यात येते. पैसे न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार पाटील यांनी दुपारीच पोलिसात दिली होती.
पाटील यांच्या तक्रारीनंतर मुकादम कांबळे यांनीही पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज पोलिसात दिला होता. सायंकाळी पाटील शहर पोलीस ठाण्यासमोर आल्या आणि त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. नेमके यावेळी तिथे असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ पाटील यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कसलीही नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चाैकट
आठवड्यात दुसरी घटना
शहर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येच्या प्रयत्नाची ही आठवड्यातील दुसरी घटना ठरली आहे. तीन दिवसांपूर्वीही पोलीस पतीला त्रास देत असल्याच्या कारणावरून वाल्मीकी आवासमधील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शनिवारी अशीच दुसरी घटना घडली आहे.