सांगलीत पोलीस ठाण्यासमोरच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:49+5:302021-03-25T04:25:49+5:30
सांगली : पतीला पोलीस चौकशीसाठी बोलावून नाहक त्रास देत असल्याचा आरोप करत महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच विषारी द्रव्य ...
सांगली : पतीला पोलीस चौकशीसाठी बोलावून नाहक त्रास देत असल्याचा आरोप करत महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच विषारी द्रव्य घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अर्चना नामदेव जाधव (वय २१, रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड, सांगली) असे त्या महिलेचे नाव आहे. मात्र, तिथे असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत तिला रोखत तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अर्चना जाधव जुन्या बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवासमध्ये राहण्यास आहे. तिचा पती नामदेव याला पोलीस वारंवार चौकशीला बोलावितात व त्याला त्रास दिला जात असल्याचे तिचे म्हणणे होते. पोलीस वारंवार बोलावत असल्यानेच पती बेपत्ता असल्याचेही तिचे म्हणणे होते. यामुळे बुधवारी दुपारी ती शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आली होती. पोलीस नाहक त्रास देत असल्याचे म्हणत तिने अचानकपणे सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले. यावेळी तिथेच असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर तातडीने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू करत तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. नेहमीच वर्दळ असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात अचानक हा प्रकार घडल्याने गर्दी झाली होती. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल अर्चना हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
चौकट
महिलेचे आरोप चुकीचे : अजय सिंदकर
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अर्चना जाधवचा पती नामदेव जाधव रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे त्यास चौकशीसाठी बोलाविण्यात येत आहे. पोलिसांकडून त्याला कोणताही त्रास दिला नसल्याने अर्चना जाधवचे आरोप चुकीचे आहेत, असे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.