सांगली: कौटुंबिक वादातून उचले टोकाचे पाऊल, महिलेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 01:36 PM2022-10-18T13:36:51+5:302022-10-18T13:37:11+5:30
कुटुंबीयांनी सुचविलेले केलेले स्थळ पसंत नसल्याचे सांगत तिने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता
जत : सिंदूर (ता. जत) येथे महिलेने दोन मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवार दि. १६ रोजी दुपारनंतर ही घटना घडली. प्रेमविवाहानंतर उद्भवलेल्या कौटुंबिक वादातून तिने हे पाऊल उचलल्याची चर्चा घटनास्थळी होती. लक्ष्मी धानेश माडग्याळ (वय २३), दिव्या धानेश माडग्याळ (२) व नऊ महिन्याचा मुलगा श्रीशैल अशी मृतांची नावे आहेत.
सिंदूर येथील लक्ष्मी माडग्याळ हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. कुटुंबीयांनी सुचविलेले केलेले स्थळ पसंत नसल्याचे सांगत तिने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यावेळी ती अल्पवयीन होती. कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याबाबत पोलिसांत तक्रारही दिली होती. लक्ष्मीच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोघेही गावी परतले. त्यानंतर सिंदूरपासून चार किलोमीटरवर आढळहट्टी रस्त्यावरील धानेश याच्या शेतात दोघेही राहत होते. दरम्यानच्या काळात त्यांना मुलगी व मुलगा अशी दोन अपत्ये झाली.
अल्पवयीन असतानाही प्रेमप्रकरणातून विवाहाबाबत पोलीस ठाण्यात दाखल प्रकरण मिटवण्यासाठी धानेश याने लक्ष्मीच्या आई-वडिलांना काही रक्कम दिली होती. या वादातून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. यातूनच तिने आत्महत्येचे मोठे पाऊल उचलले असावे अशी चर्चा होती.
रविवारी दुपारी तिने विहिरीत उडी घेतल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शाेध सुरू केला. मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने अडथळे येत हाेते. मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास नऊ महिन्यांच्या श्रीशैल याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर सांगाेला येथील बचाव पथकाने साेमवारी सकाळी लक्ष्मी व दिव्या यांचे मृतदेह बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पंचनामा करून तीनही मृतदेहांची जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.
आठवड्यात दुसरी घटना
गेल्या आठवड्यात बिळूर (ता. जत) येथील विवाहितेने तीन मुलींसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात सिंदूर येथे विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.