सांगली: वज्रचौंडेत चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 05:17 PM2022-11-07T17:17:10+5:302022-11-07T17:17:51+5:30
डॉक्टरांनी त्या महिलेला इंजेक्शन दिले व सलाईन लावले; परंतु काही वेळातच त्या महिलेच्या इंजेक्शन दिलेल्या हातावर फोड आले व हात सुजला. महिलेची तब्येत गंभीर बनली. शरीर व हात निळसर पडला
गव्हाण : वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे डॉक्टराने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरविरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दाखल दिली आहे. छाया बबन करपे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.
वज्रचौंडे येथील छाया करपे ही महिला सर्दी व किरकोळ ताप आला म्हणून ३० ऑक्टोबर रोजी गव्हाण (ता. तासगाव) येथील डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली होती. डॉक्टरांनी त्या महिलेला इंजेक्शन दिले व सलाईन लावले; परंतु काही वेळातच त्या महिलेच्या इंजेक्शन दिलेल्या हातावर फोड आले व हात सुजला. महिलेची तब्येत गंभीर बनली. शरीर व हात निळसर पडला; यामुळे गोंधळलेल्या डॉक्टरांनी तिला सांगलीच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यासाठी चिठ्ठी दिली.
तातडीने नातेवाइकांनी महिलेला सांगली येथे हलवले. परंतु या महिलेची गंभीर स्थिती पाहून तिला खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. नातेवाइकांनी तिला सांगली सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
गुन्हा दाखल होण्यासाठी मृत महिलेचे नातेवाईक, विविध संघटना सक्रिय झाल्या असून, तासगाव पोलीस कोणत्या अहवालाची वाट पाहत आहेत, अशी चर्चा नातेवाइकांत केली जात आहे.