माता न तू वैरिणी...सांगलीत १५ दिवसांच्या अर्भकाला टाकून महिलेचे पलायन, पोलिसांकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 04:15 PM2023-08-23T16:15:18+5:302023-08-23T16:16:08+5:30
सांगली : पंधरा दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला रस्त्याकडेच्या शेतात फेकून महिलेने पलायन केले. कर्नाळ-नांद्रे मार्गावर मंगळवारी सकाळी हा प्रकार ...
सांगली : पंधरा दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला रस्त्याकडेच्या शेतात फेकून महिलेने पलायन केले. कर्नाळ-नांद्रे मार्गावर मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. रस्त्याकडेला रडत असलेले बाळ पाहून शेतात काम करत असलेल्या मजुरांनी ‘त्या’ महिलेचा शोध सुरू केला; परंतु ती मिळून आली नाही. रडत असलेल्या त्या अर्भकाला रस्त्याने जाणाऱ्या महिलांनी आधार देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
कर्नाळ-नांद्रे मार्गावर पश्चिम बाजूस असलेल्या अशोक नारायण रजपूत यांच्या मालकीची शेती आहे. मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास शेतातील बांधावर असलेल्या एका झाडाखाली बाळ रडत असल्याचे लक्षात आले. यानंतर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या अर्भकास दुपट्यामध्ये गुंडाळून त्या महिलेने उघड्यावरच टाकून दिले होते. रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना हा प्रकार समजताच त्यांनी गर्दी केली. त्यातीलच काही महिलांनी त्या अर्भकास मांडीवर घेत शांत केले. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. महिला डॉक्टरांनीही यावेळी अर्भकाच्या प्रकृतीची तपासणी केली.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी विष्णू भगवान काळे यांनी फिर्याद दिली असून, २५ ते ३० वर्षे वयाच्या महिलेने हे अर्भक तिथेच टाकून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आता पोलिसांनी ‘त्या’ मातेचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली.