Sangli: भोसेतील बेजबाबदार यंत्रणेमुळे महिलेची वाटेतच प्रसूती, प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 01:32 PM2023-06-01T13:32:16+5:302023-06-01T13:32:41+5:30

भोसे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Woman gives birth on the way due to irresponsible system in Bhose | Sangli: भोसेतील बेजबाबदार यंत्रणेमुळे महिलेची वाटेतच प्रसूती, प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत संताप

Sangli: भोसेतील बेजबाबदार यंत्रणेमुळे महिलेची वाटेतच प्रसूती, प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत संताप

googlenewsNext

मालगाव : जनतेच्या आरोग्याबाबत बेजबाबदार असणाऱ्या मिरज तालुक्यातील भोसे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेतच प्रसूती होण्याची वेळ आली. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यसेवेबाबत वादग्रस्त ठरले आहे. अनेकवेळा वैद्यकीय अधिकारी मुक्कामाच्या ठिकाणी नसल्यामुळे रुग्णांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले. तक्रारी केल्यानंतर दोषींना पाठीशी घालण्याचा उद्योग वरिष्ठांकडून घडल्याने कारवाई झाली नाही. त्यामुळे बेफिकीर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा फटका प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला बसला आहे.

चार दिवसांपूर्वी कार्यक्षेत्रातील एका गावातील महिला रात्री १० वाजता प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आली होती. मात्र, केंद्राच्या मुख्य दरवाजालाच कुलूप लावल्याचे निदर्शनास आल्याने महिलेच्या नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी उपकेंद्रातील आरोग्य सेविकेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

आरोग्यसेविकेनेही फोनला प्रतिसाद न दिल्याने अडचणीत सापडलेल्या नातेवाइकांनी गर्भवती महिलेला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच महिलेची वाटेतच प्रसूती झाली. या गंभीर घटनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दोषींना पाठीशी न घालता निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.

कारवाईची मागणी

भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावर नागरिकांतून नाराजी कायम आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सध्या घडलेली घटना गंभीर आहे. या प्रकरणाचा अहवाल काही असो, वरिष्ठांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Woman gives birth on the way due to irresponsible system in Bhose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.