गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच, सांगलीत महिला पोलिस हवालदारास रंगेहाथ पकडले
By अविनाश कोळी | Updated: December 18, 2024 16:17 IST2024-12-18T16:15:53+5:302024-12-18T16:17:16+5:30
सांगली : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील हवालदार श्रीमती मनिषा नितीन ...

गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच, सांगलीत महिला पोलिस हवालदारास रंगेहाथ पकडले
सांगली : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील हवालदार श्रीमती मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच चौकशीकामी मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले.
तत्पूर्वी संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, अंमलदार सीमा माने, विना जाधव, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे यांनी केली. कोंगनोळीकर यांच्यावर रितसर गुन्हा नाेंदविण्यात आले असून पुढील कारवाईच्या हालचाली बुधवारी सुरु होत्या.
नागरिकांनी तक्रार द्यावी
कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अथवा १०६४ या हेल्पलाईन व्हॉटस् अॅप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी केले आहे.