सांगलीत बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटणाऱ्या महिलेस अटक, साडेसहा लाखांचा ऐवज जप्त
By शरद जाधव | Published: October 23, 2022 08:39 PM2022-10-23T20:39:37+5:302022-10-23T20:40:08+5:30
मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता.
सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेस पोलिसांनी जेरबंद केले. अनघा अनंत जोशी (वय ६१, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव असून, तिच्याकडून सहा लाख ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयांची रोकड, असा सहा लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक सुशिक्षित वयस्कर महिला गर्दीचा फायदा घेऊन चोरी करून निघून जात असल्याचे दिसून आले होते.
यानंतर पोलिसांनी तपास आणखी वाढवत जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, शाहूवाडी, शिरोळ, मलकापूर, साखरपा व रत्नागिरी येथील बसस्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात संशयित अनघा जोशी ही सांगलीत चोरी करून याच मार्गावरून रत्नागिरीला जात असल्याचे दिसून आले. चार ते पाच महिन्यांपासून पोलीस या महिलेची माहिती घेत होते. त्यानुसार पोलिसांनी सांगली बसस्थानकावर चोरी करणारी जोशी हीच महिला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून सहा लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये जप्त करण्यात आले. सांगली शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.
जोशी रेकॉर्डवरील गुन्हेगार -
प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणारी जोशी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी तिच्यावर लांजा व देवरुख पोलिसांतही गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून सांगली शहर, शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सुशिक्षित दाखवत चोऱ्या -
पोलिसांनी अटक केलेली अनघा जोशी ही रत्नागिरी येथून सांगलीत येऊन चोऱ्या करत असे. वयानेही ज्येष्ठ असलेल्या या संशयित महिलेबाबत कोणालाही संशय येत नसे. पोलिसांच्या पहिल्या तपासालाही त्यामुळे आव्हान निर्माण झाले होते.