सांगलीतील महिलेचा दगडाने ठेचून खून, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 09:40 PM2017-09-20T21:40:44+5:302017-09-20T21:40:58+5:30
येथील खणभागात राहणा-या कलावती उदय पिसे (वय ४५) या महिलेचा खोतवाडी (ता. मिरज) हद्दीतील शेतात दगडाने ठेचून खून करण्यात आला.
सांगली, दि. 20 : येथील खणभागात राहणा-या कलावती उदय पिसे (वय ४५) या महिलेचा खोतवाडी (ता. मिरज) हद्दीतील शेतात दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. महिलेचा तीन ते चार दिवसांपूर्वी खून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
खणभागात कलावती पिसे भाड्याने खोली घेऊन रहात होत्या. त्यांच्या पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे. त्यांना मुले नाहीत. पतीच्या निधनानंतर त्या एकट्यात रहात होत्या. मंदिरासमोर नारळ, कापूर व पूजा साहित्य विकून त्या उदरनिर्वाह करीत होत्या. रविवारी त्या घरातून गायब झाल्या होत्या. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रारही दिली होती.
दरम्यान, बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास सांगली ग्रामीण पोलिसांना शिरगाव-कवठेएकंद रस्त्यावरील खोतवाडी हद्दीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. महिलेचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मृतदेहाची अवस्था पाहता तीन ते चार दिवसांपूर्वीच खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. सुरुवातीला महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचण आली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी हरविलेल्या व्यक्तींबाबत विविध पोलिस ठाण्यांत चौकशी केली. खणभागातील कलावती पिसे ही महिला हरविल्याची तक्रार होती. त्यानुसार पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. याप्रकरणी पिसे यांचे दीर विनायक पिसे यांनी फिर्याद दिली आहे.
त्या खोतवाडीला का गेल्या?
कलावती पिसे अशक्त होत्या. त्या हळूहळू चालत. सांगलीपासून बारा किलोमीटरवरील खोतवाडी व आजूबाजूच्या गावात त्यांचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे त्या खोतवाडीपर्यंत कशा पोहोचल्या? तिकडे त्या कशासाठी गेल्या होत्या? याबाबत त्यांचे नातेवाईकही शंका उपस्थित करीत आहेत. या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.