सातारच्या समाज कल्याण अधिकारी महिलेस लाखाची लाच घेताना अटक

By घनशाम नवाथे | Published: June 5, 2024 09:53 PM2024-06-05T21:53:25+5:302024-06-05T21:53:50+5:30

लाचेच्या मागणीबद्दल निरीक्षकाला देखील अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ सामाजिक न्याय भवनमधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात सापळा रचला

Woman social welfare officer of Satar arrested for taking bribe of Rs | सातारच्या समाज कल्याण अधिकारी महिलेस लाखाची लाच घेताना अटक

सातारच्या समाज कल्याण अधिकारी महिलेस लाखाची लाच घेताना अटक

सांगली : शैक्षणिक संस्थेस मंजूर अनुदानासाठी पाच लाख रूपये लाचेची मागणी करून एक लाखाची लाच घेताना समाज कल्याणच्या अतिरिक्त सहायक संचालक तथा सातारा जि.प. समाज कल्याण अधिकारी सपना सुखदेव घोळवे (वय ४०) यांना सांगलीत अटक केली. तसेच समाज कल्याण निरीक्षक दिपक भगवान पाटील (वय ३६) याने आश्रम शाळेच्या अनुदानाच्या धनादेशासाठी दहा हजार रूपयाची मागणी केल्याबद्दल त्यालाही अटक केली. समाज कल्याण विभागातील लाचखोरांवरील कारवाईच्या डबल धमाक्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

अधिक माहिती अशी, तक्रारदार यांची एक शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेस शासनामार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्यासाठी ५९ लाख ४० हजार रूपये अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानाचा पहिला हप्ता २९ लाख ७० हजार रूपये शाळेला दिला आहे. पहिला हप्ता दिल्याचा मोबदला म्हणून दहा टक्के व दुसरा हप्ता देण्यासाठी दहा टक्के रक्कम मिळून सहा लाख रूपये लाचेची मागणी घोळवे यांनी केली. त्यांच्याकडे सांगलीत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार संस्थेच्या पदाधिकारी यांनी ५ जून रोजी तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये घोळवे यांनी सहा लाख रूपये लाच मागितली. चर्चेअंती पाच लाख रूपये व त्यानंतर अडीच लाख रूपये लाचेची मागणी करत पहिला हप्ता एक लाख रूपये लगेच घेऊन येण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ सामाजिक न्याय भवनमधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रूपये लाच घेताना घोळवे यांना रंगेहाथ पकडले. तर याच कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक दिपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून दहा हजार लाचेची मागणी केल्याबद्दल अटक केली. दोघांविरूद्ध रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रितम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, अनिस वंटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कारवाईचा डबल धमाका-

सपना घोळवे यांच्याकडे सांगलीचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांना लाच घेताना आणि निरीक्षक दीपक पाटीलला लाचेच्या मागणीबद्दल अटक केली. एकाचवेळी दोघांना अटक केल्यामुळे समाज कल्याणमधील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

Web Title: Woman social welfare officer of Satar arrested for taking bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.