जतमध्ये वीज अंगावर पडून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:47+5:302021-04-26T04:24:47+5:30
संख : जत येथे अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू झाला. तुळसाबाई यशवंत डोंबाळे (वय ५०, रा. ...
संख : जत येथे अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू झाला. तुळसाबाई यशवंत डोंबाळे (वय ५०, रा. विठ्ठलनगर, जत) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना अमृत सावंत यांच्या मळ्यात रविवारी दुपारी ४ वाजता घडली. घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
जत परिसरात रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान अचानक ढगाळ वातावरण व विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. तुळसाबाई डोंबाळे व कलाबाई ऐनापुरे या दोघी विठ्ठलनगरपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डोण परिसरातील अमृत सावंत मळ्यात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या.
अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. यावेळी लिंबाच्या झाडाखाली तुळसाबाई व सजाबाई दोघी बोलत उभ्या होत्या. यावेळी अचानक अंगावर वीज पडली.
यात तुळसाबाई डोंबाळे या जागीच ठार झाल्या. यावेळी कलाबाई ऐनापुरे या थोड्या अंतरावर गेल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. तुळसाबाई यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
ही घटना समजताच माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे, विक्रम ढोणे, योगेश मोटे, नितीन साळे, पप्पू कांबळे, मेहबूब शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, शरद शिंदे, तलाठी रवींद्र घाडगे, कोतवाल सुभाष कोळी, पोलीस पाटील मदन माने -पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.