सोन्याची बिस्किटे देण्याच्या आमिषाने महिलेस सव्वा लाखाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:55+5:302021-03-20T04:24:55+5:30
सांगली : कमी किमतीत सोन्याची बिस्किटे देण्याच्या आमिषाने भाजीविक्रेत्या महिलेस एक लाख २० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. या ...
सांगली : कमी किमतीत सोन्याची बिस्किटे देण्याच्या आमिषाने भाजीविक्रेत्या महिलेस एक लाख २० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पवित्रा रावसाहेब पाटील (वय ५८, रा. कामगार भवनजवळ, कोल्हापूर रोड, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पाटील या शिवाजी मंडईमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तर कोल्हापूर रोडवर एकट्याच राहण्यास आहेत. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भाजीविक्री करून त्या घरी जात होत्या. मारुती चाैकातून राजन चौकाकडे त्या जात असतानाच, एक महिला त्यांच्याजवळ आली व पायात काहीतरी टाकले व ते लगेच उचलून मागे निघून गेली. नेमके याचवेळी एक अनोळखी पुरुष तिथे आला व त्याने त्यांना तुमच्या पायाखाली सोन्याचे बिस्कीट हाेते ते त्या महिलेला सापडले आहे. चला बघूया म्हणून तो त्यांना घेऊन आला. त्यावेळी ती महिला सिटी हायस्कूल रोडवर उभी होती. तिने महिलेला त्यांना कंबरेला लावलेल्या कापडातील वस्तू दाखवत माझ्याकडे सोन्याची बिस्किटे आहेत, ती घेऊन मला एक लाख रुपये द्या म्हणाली. यावर पाटील यांनी पैसे नसल्याचे सांगितले, तर तिथे असलेल्या अनोळखी व्यक्तीने माझ्याकडेही पैसे नाहीत मात्र, हातातील अंगठ्या घ्या व सोन्याची बिस्किटे द्या म्हणाला. त्यामुळे पाटील यांनीही गळ्यातील माळ, कर्णफुले, झुबे काढून त्या महिलेस दिले व सोन्याची बिस्किटे घेतली.
घरात जाऊन त्यांनी भाची अर्चना बेरडे व घरमालकीण शारदा सातपुते यांना ती बिस्किटे दाखविली असता, ती खोटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधत फिर्याद दाखल केली आहे.