महिलांकडून महापौरांना शिवीगाळ
By admin | Published: May 29, 2017 11:18 PM2017-05-29T23:18:23+5:302017-05-29T23:18:23+5:30
महिलांकडून महापौरांना शिवीगाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पाणीप्रश्नी सोमवारी शामरावनगर येथील सुमारे पन्नास महिलांनी महापौर हारुण शिकलगार यांना घेराव घातला. ठोस निर्णय होत नसल्याने संतप्त महिलांनी महापौरांना शिवीगाळ केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. अन्य नगरसेवकांनीही याठिकाणी धाव घेत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आणि शामरावनगरमध्ये तात्पुरती जलवाहिनी टाकण्याचे काम सायंकाळी सुरू झाले.
पाणीटंचाईमुळे झालेल्या भांडणात शामरावनगरमधील एका महिलेचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यानंतर या भागातील पाणीप्रश्न महापालिकेत चर्चेस आला. आश्वासनांचा वर्षाव करून येथील नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त व महापौरांनी केला. बुधवारपर्यंत शामरावनगरचा पाणीप्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिले होते. तरीही तो सुटला नाही. त्यामुळे या भागातील सुमारे पन्नास महिलांनी महापालिकेवर हल्लाबोल केला. दुपारी दीड वाजता त्यांनी महापौर हारुण शिकलगार यांचे कार्यालय गाठले.
त्यांनी प्रश्नांचा पाऊस पाडत संताप व्यक्त केला. महापौरांनी त्यांना पुन्हा आश्वासन देण्यास सुरुवात केल्यानंतर महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी थेट शिवीगाळ सुरू केली. एकेरी भाषेतही पाणउतारा केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
उपमहापौर विजय घाडगे, शेखर माने, गौतम पवार यांनी महापौर कार्यालयाकडे धाव घेतली. महिलांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याचठिकाणी प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन माने यांनी दिले. त्यानंतर महापौरांशी चर्चा करून सर्वजण उपायुक्तांच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी पाणीपुरवठा, ड्रेनेज व अन्य अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. शामरावनगरचा पाणीप्रश्न सोडविण्याचे आदेश यापूर्वी दिले असले तरी, ड्रेनेज विभागप्रमुख शीतल उपाध्ये व पाणीपुरवठा अधिकारी शरद सागरे या दोन विभागप्रमुखांच्या भांडणात हा प्रश्न प्रलंबित पडल्याची बाब यावेळी निदर्शनास आली. दोन्ही अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत काम सुरू केले नाही, तर संतप्त महिलांना तुमच्याच कार्यालयात पाठविण्यात येईल, असा इशारा शेखर माने यांनी दिला.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी थेट शामरावनगर गाठले. ज्या भागात पाणीटंचाई आहे त्याठिकाणी तात्पुरती समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम त्यांनी लगेच सुरू केले.
ठेकेदाराची बाजू
आंदोलनकर्त्या महिलांसमोरच अधिकाऱ्यांमधील वाद स्पष्ट झाला. एका अधिकाऱ्याने ड्रेनेज ठेकेदाराची बाजू घेतली. वास्तविक ड्रेनेजच्या कामामुळे जलवाहिनी फुटून शामरावनगरचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
तासभर घेराव
महापौरांना आंदोलनकर्त्या महिलांनी तासभर घेराव घातला होता. प्रश्न सोडविल्याशिवाय कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी स्वीकारली होती.
महिलांच्या संतापाने प्रश्न मार्गी
शामरावनगरमधील नागरिकांनी तीन ते चारवेळा महापालिकेत येऊन लोकशाही मार्गाने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र सहनशीलतेचा बांध फुटल्यानंतर संतप्त महिलांनी आपले रौद्ररूप महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांना दाखविले. त्यांच्या संतापासमोर प्रशासन झुकले आणि त्यांनी उपाययोजना सुरू केली. आंदोलनात रेश्मा पाकजादे, रेश्मा मरब, शालन काळेल, शैला थोरात, नबी शेख, अबू मरब, महम्मद जिंतीकर, शकील मिरजे, मकसूद शेख, रहिमतबी मुजावर, दिलशान मुल्ला, फरिदा शेख आदी सहभागी झाले होते.