महिला बाल कल्याण समितीचा कोटीचा निधी पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:11+5:302020-12-31T04:27:11+5:30
सांगली : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीकडील ९१ लाखांचा निधी परस्परच चिल्ड्रेन पार्कसाठी घेण्यात आला. याबाबत समितीच्या सभेची ...
सांगली : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीकडील ९१ लाखांचा निधी परस्परच चिल्ड्रेन पार्कसाठी घेण्यात आला. याबाबत समितीच्या सभेची मान्यताही घेण्यात आली नाही. प्रशासनाने परस्परच हा निधी पळविला असल्याचा आरोप समितीच्या सदस्य नगरसेविका आरती वळवडे यांनी केला आहे. याबाबत वळवडे यांनी थेट नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून हा ठराव रद्द करण्याचे साकडे घातले आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात महिला व बालकल्याण समितीसाठी ५ टक्के निधी राखीव आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे हा निधी खर्च झालेला नाही. त्यात समितीची एकही सभा होऊ शकलेली नाही. यात बांधकाम विभागाने महापालिकेच्या मालकीच्या नेमिनाथनगर येथील सि. स. नं ३५२ या खुल्या भूखंडावर चिल्ड्रन पार्क विकसित करण्याचा विषय स्थायी समितीसमोर आणला आहे. त्यानंतर हा विषय महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांना निदर्शनास येताच खळबळ उडाली. समितीची मान्यतेविनाच ९१ लाखांचा निधी चिल्ड्रन पार्कसाठी कसा काय वर्ग करण्यात आला, याचीच चर्चा नगरसेविकेत सुरू झाली.
दरम्यान, समितीच्या सदस्या वळवडे यांनी थेट नगरविकास मंत्री शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. समितीच्या सदस्यांना अंधारात ठेवून परस्परच चिल्ड्रन पार्क विकसित करण्याचा विषय स्थायी समितीसमोर आणला आहे. त्यासाठी समितीची मान्यताही घेण्यात आलेली नाही. हा प्रकार महिला सदस्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. त्यामुळे स्थायी समितीने ठराव केला तरी, तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
चौकट
नाट्यगृहाऐवजी चिल्ड्रन पार्क
शासनाच्या १०० कोटींच्या निधीतून आमदार सुधीर गाडगीळ यांनी नेमिनाथनगर येथील जागेवर अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला. पण ही जागा खासगी व्यक्तीच्या नावावर असून, त्यावर आरक्षण असल्याचा मुद्दा उपस्थित करीत नाट्यगृहाचा विषय फेटाळण्यात आला होता. आता याच जागेवर चिल्ड्रन पार्क विकसित होत आहे. हे कसे काय? असा प्रश्न भाजप नगरसेवकांनाही पडला आहे.