Sangli: जतमधील दुकानदाराने भगर दळून पीठ तयार केल्याचे स्पष्ट, विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या ३४९ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:52 PM2024-10-07T18:52:00+5:302024-10-07T18:53:16+5:30
दरीबडची : जत तालुक्यात नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्या महिला व पुरुषांना भगरीच्या पिठातून झालेली विषबाधा झाली होती. हे पीठ जगदंबे ...
दरीबडची : जत तालुक्यात नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्या महिला व पुरुषांना भगरीच्या पिठातून झालेली विषबाधा झाली होती. हे पीठ जगदंबे ट्रेडिंग कंपनी या व्यावसायिकाने स्वतः दळून तयार केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. हे पीठ त्याने पॅकिंग करून तालुकाभरातील ग्राहकांनी विक्री केली.
दरम्यान, रविवारी तालुक्यातील डफळापूर, कुडणूर, जत, बेळुंखी, आवंढी येथील आणखी २४ रुग्णांना विषबाधा झाल्याचे पुढे आले. एकूण बाधित रुग्णसंख्या ३४९ वर पोहोचली आहे. तालुक्यातील २६ गावांत भगरीतून विषबाधा झाली आहे. सर्व रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जतमध्ये वळसंग रस्त्यावरील जगदंबे ट्रेडिंग कंपनीचे घाऊक विक्रीचे दुकान सील केले आहे. दुकानातून ३ लाख ३४ हजार ९१८ किमतीचे विविध कंपन्यांचे भगरीचे नमुने जप्त केले आहेत. त्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. चाचणीचा अहवाल एकदोन दिवसांत येणार असल्याचे सांगण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अनिल पवार, धनंजय आघाव यांनी जतमध्ये घाऊक व्यापाऱ्यांकडे चौकशी केली. जगदंबे ट्रेडिंग कंपनीचे मालक गणपत मोताराम पटेद यांनी भगरीचे पीठ तालुक्यातील पंधरा ते वीस दुकानांना किरकोळ विक्रीसाठी दिल्याचे निदर्शनास आले.
या गावांत मोठ्या संख्येने विषबाधा
जत तालुक्यातील वाळेखिंडी, नवाळवाडी, शेगाव, कुंभारी, मोकाशेवाडी, आवंढी, बनाळी, डफळापूर, कुडणूर, बेळुंखी, वायफळ, संख, माडग्याळ, व्हसपेठ, राजोबाचीवाडी, गुड्डापूर, आसंगी, आबाचीवाडी, वळसंग, सिंगनहळळी, कुलाळवाडी, कोळेगिरी, लकडेवाडी, कुणीकोनूर, टोणेवाडी या गावांमध्ये विषबाधा झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आहेत.
आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण
विषबाधेची घटना उघडकीस येताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पथके, आशा वर्कर यांच्यामार्फत गावोगावी सर्वेक्षण करण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. तालुक्यातील व्यावसायिकांनी भगर व भगरीच्या पीठाची विक्री करू नये, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
जगदंबे ट्रेडिंग कंपनीने स्वतः भगर दळून पीठाचे पॅकिंग केले. त्यातूनच विषबाधा झाली आहे. ग्रामस्थांनी भगरीचे पीठ खाणे टाळावे. चाचणीचा अहवाल आल्यानंतर दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. - अनिल पवार अन्न सुरक्षा अधिकारी, सांगली