सोशल मीडियावरही होतोय महिलांचा छळ; ‘सायबर’कडे तक्रारी वाढल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:36+5:302021-07-24T04:17:36+5:30
सांगली : स्मार्ट फोनच्या वापराने अधिक ‘स्मार्ट’ झालेल्या महिलांना सोशल मीडियावर मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनोळखी लोकांकडून ...
सांगली : स्मार्ट फोनच्या वापराने अधिक ‘स्मार्ट’ झालेल्या महिलांना सोशल मीडियावर मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनोळखी लोकांकडून हा छळ होत असून, अश्लील व्हिडिओ पाठविणे, घाणेरडे संदेश पाठविणे यासह महिलांच्या वैयक्तिक माहितीचाही दुरूपयोग होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.
सोशल मीडियावर खाते असलेल्या अनेक महिलांना अनोळखी लोकांकडून संदेश येतात. मात्र, यासह इतर संतापजनक प्रकारही वाढले आहेत. अनेक महिला असे झाल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी सोशल मीडियाचा वापर थांबवित आहेत.
चौकट
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
* सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही त्रास झाल्यास त्यावर तक्रारीसाठी पोलिसांचे सायबर पोलीस ठाणे कार्यरत असलेतरी अनेक महिला तक्रार करण्याचे टाळतात.
* तक्रार केल्यास पुन्हा चौकशी आणि पुढील प्रक्रियेमुळे त्रास होईल या शक्यतेने बहुतांश महिला तक्रार दाखलच करत नाहीत.
चौकट
येथे करा तक्रार
१) सायबरविषयक तक्रारींच्या निवारणासाठी खास सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहे. महिला याठिकाणी तक्रार दाखल करू शकतात.
२) याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात सखी डेस्क कार्यरत असून, याठिकाणीही महिला आपल्या तक्रारी देऊ शकतात.
३) सोशल मीडियाचा वापर करताना पुरेशी काळजी घेतल्यास होणारा त्रास टाळता येऊ शकतो.
कोट
सोशल मीडियाचा वापर आज अनिवार्य झाला असला तरी त्यात असलेले सुरक्षा उपाय आणि सेटिंग्जचा वापर केल्यास त्रास होणार नाही. महिलांनी सर्व सोशल मीडियावर या सुरक्षा साधनांचा वापर करावा.
गीतांजली पाटील, व्यवस्थापक, मी सक्षमा फाउंडेशन
कोट
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही छळ झाल्यास महिलांनी तो सहन करू नये. तात्काळ पोलिसात तक्रार दाखल करावी. पुन्हा पुन्हा असे होणारे प्रकार टाळण्यासाठी मोबाइलचा वापर करताना काळजी घ्यावी.
ज्योती आदाटे, सामाजिक कार्यकर्त्या
कोट
गेल्या काही वर्षांपासून सायबरकडे येत असलेल्या तक्रारीत सोशल मीडियावरील त्रासाच्या तक्रारी येत आहेत. याबाबत तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येते.
संजय क्षीरसागर, सहा. पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे