प्रत्येक कुटुंबातील महिलांचा आदर व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:39+5:302021-03-19T04:25:39+5:30
विटा : महिलांना कायद्याचे मोठे संरक्षण असल्याने महिलांनी सबळ व्हावे. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये. ज्या कुटुंबात स्त्रीचा ...
विटा : महिलांना कायद्याचे मोठे संरक्षण असल्याने महिलांनी सबळ व्हावे. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये. ज्या कुटुंबात स्त्रीचा आदर केला जात नाही तेथे सर्व काही व्यर्थ आहे. त्यामुळे समाजासह प्रत्येक कुटुंबातील महिलांचा आदर व्हावा, अशी अपेक्षा विटा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एन. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
विटा येथे खानापूर तालुका विधि सेवा समिती व विटा वकील संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिरात न्या. कुलकर्णी बोलत होते. यावेळी दुसरे सह. दिवाणी न्यायाधीश जी. एस. हांगे, तिसरे सह. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग डी. एम. हिंग्लजकर, विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. एस. जी घोरपडे, उपाध्यक्षा अॅड. शौर्या पवार, सचिव अॅड. पी. एस. बागल, सहसचिव अॅड. पी. एस. माळी, सरकारी वकील अॅड. एम. आर. भांदुर्गे उपस्थित होते. यावेळी अॅड. श्रीमती एस. बी. वेल्हाळ व अॅड. शबाना एम. मुल्ला यांनी महिलांसाठी तयारी केलेली कविता सादर केली. या शिबिरात वकील संघटनेच्या उपाध्यक्षा अॅड. शौर्या पवार यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले, तर अॅड. ऋचा ग. जोशी यांनी महिलांचे घरगुती अत्याचारापासून संरक्षण अधिनियम याबाबत माहिती दिली. त्यानंतर अॅड. संतोष शिंदे यांनी लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या महिलांच्यासाठी 'पिढीता नुकसानभरपाई योजना व मनोधैर्या योजना' या शासनाच्या योजनांची माहिती दिली. अॅड. अबोली चं. पवार यांनी 'महिलांचा त्यांच्या कामाचे ठिकाणी होणारा लैंगिक छळ’ विरोधी कायद्याबाबत माहिती विशद केली.
विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. एस. जी. घोरपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या शिबिरास पक्षकार, वकील, कर्मचारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोविड-१९ या साथ रोगाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून विटा येथील न्यायालयाच्या इमारतीच्या आवारात महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पाडण्यात आले.
फोटो - १८०३२०२१-विटा-महिला शिबिर : विटा येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला कायदेविषयक जनजागृती शिबिरात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एन. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी न्या. जी. एस. हांगे, न्या. डी. एम. हिंग्लजकर, अॅड. एस. जी. घोरपडे, अॅड. शौर्या पवार उपस्थित होते.