‘शक्तिपीठ’ रद्दसाठी सांगलीतील महिलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:50 IST2025-02-12T15:48:04+5:302025-02-12T15:50:58+5:30
आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते?

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी सांगलीतील महिलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध
सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी बुधगाव (ता. मिरज) येथील महिला शेतकऱ्यांनी मंगळवारी स्वत:च्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. आम्हाला भूमिहीन करून शक्तिपीठ महामार्ग कशासाठी करत आहे? असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.
बाधित शेतकऱ्यांची महिलासह बुधगाव येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली. या ठिकाणी एकत्र येऊन महिला शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत काढले व बोरुने माझी जमीन बागायती आहे. सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे माझी जमीन प्रस्तावित महामार्गासाठी द्यायची नाही. तसेच या महामर्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे. सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली.
किसानसभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही, असे विधान केले होते. तसेच कोल्हापूरमध्ये आमदार क्षीरसागर यांनीही शक्तिपीठ महामार्ग होणारच असे विधान केले आहे. आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते?. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द केल्यानंतरही ते बोलले नाहीत? शक्तिपीठचे समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच कोठून आला? हिम्मत होती तर निवडणूक प्रचारात त्यांनी हे विधान करायचे होते.
सर्व आमदारांशी चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतायत मग सांगलीचे आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात. याचे उत्तर मुख्यमंत्री देतील काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठविली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उमेश एडके, प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, अनिल डुबल, रामदास पाटील, वैशाली पाटील सरपंच, शुभांगी शिंदे, उपसरपंच वनिता पाटील, तृप्ती पाटील, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
घरादारावर नांगर फिरविण्याची धोरण बदला : महेश खराडे
विकासाच्या गप्पा मारून शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे राज्य सरकारची धोरण असून ते उधळून लावले जातील. विकासाचे कारण पुढे करुन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही, असा आरोपही महेश खराडे यांनी केला.