सांगली जिल्ह्यातील माडग्याळमधील महिलांची भरारी, एकरात घेतली १२ क्विंटल तुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 01:55 PM2023-12-18T13:55:53+5:302023-12-18T13:57:26+5:30

राहुरी कृषी शास्त्रज्ञांची शाबासकीची थाप

Women group farmers in Madgyal produced 12 quintals of turi per acre | सांगली जिल्ह्यातील माडग्याळमधील महिलांची भरारी, एकरात घेतली १२ क्विंटल तुरी

सांगली जिल्ह्यातील माडग्याळमधील महिलांची भरारी, एकरात घेतली १२ क्विंटल तुरी

दरीबडची : माडग्याळ (ता. जत) येथील महिला गट शेतकऱ्यांनी तुरीचे रोप तयार करून ठिबक आणि मलचिंग करून बेडवर लागवड केली. नावीन्यपूर्ण प्रयोग केला. १२ क्विंटल उत्पादन तुरीचे घेतले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ थेट शेतकरी गटाला शाबासकीची थाप देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली.

तालुक्यात अवेळी पडणारा पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे तूर पिकाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. माडग्याळ गावातील समता महिला गटाने एकत्र येऊन तूर पीक करायचे ठरवले. मागील चार ते पाच वर्षांचा विचार करता एकरी सरासरी चार ते पाच क्विंटल असे तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती यायचे आणि कधी कधी शेतकरी जनावरांना चारा म्हणून पण सोडून देत असत.

यंदा कमी व जेमतेमच पाऊस झाला. महिला गटाने पारंपरिक पद्धतीने तूर पीक न घेता आधुनिक पद्धतीने लागण केली. त्यामध्ये तुरीचे रोप तयार करून २० दिवसांनी त्याला ठिबक आणि मलचिंग करून बेडवर लागवड केली. त्यामुळे पिकात कोणतेही तण आले नाहीत. खर्चात बचत झाली.

या प्रयोगाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ तूर विषयाचे शास्त्रज्ञ व पानी फाउंडेशनमार्फत घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन पद्धतीच्या शेती शाळेत मार्गदर्शन केले. अगदी सोप्या भाषेत आणि योग्य वेळेवर मार्गदर्शन केले. तूर उत्पादनात वाढ झाली.

शास्त्रज्ञांनी दिली भेट

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, कडधान्य सुधार प्रकल्प प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायाळ, कीटक शास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, शास्त्रज्ञ डॉ. अरविंद तोतरे यांनी शेतकरी गटाला भेट दिली. तूर पिकामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाची पाहणी केली.

गटांसोबत संवाद

शास्त्रज्ञांनी गटासोबत संवाद साधला. यावेळी तालुका समन्वयक तुकाराम पाटील, प्रशिक्षक अवधूत गुरव, प्रशांत गवंडी, महादेव माळी, श्रावण कोरे, शशिकांत माळी, सरपंच अनिता माळी व गटातील इतर सदस्य उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे आठ गट

यावर्षीपासून सुरू झालेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप पानी फाउंडेशन’अंतर्गत गट शेती स्पर्धेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी खरीपमधील विविध पिकांचे आठ गट तयार केले होते.

Web Title: Women group farmers in Madgyal produced 12 quintals of turi per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.