मगरीच्या हल्ल्यात महिला जखमी
By Admin | Published: October 3, 2016 12:22 AM2016-10-03T00:22:16+5:302016-10-03T00:22:16+5:30
सुखवाडीतील घटना : घागरीमुळे सुटका; वन विभागाचे दुर्लक्ष
भिलवडी : सुखवाडी (ता. पलूस) येथील सौ. कल्पना जालिंदर कदम (वय ४७) या महिलेवर मगरीने हल्ला केला. मात्र हातातील भांडे मगरीच्या तोंडात अडकल्याने मगरीच्या तावडीतून या महिलेची सुटका झाली. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली. मात्र या प्रकरणाची वाच्यता कोठेही होऊ नये म्हणून वन विभागानेच सुखवाडीतील नागरिकांवर दबाव टाकला असल्याची चर्चा सर्व परिसरात होत आहे.
सुखवाडी येथील महिला कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर धुणे धुणाऱ्या महिलांची मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या या मगरीच्या हल्ल्यामुळे पाणवठ्यावरील सर्व महिला भीतीने पळू लागल्या. कल्पना कदम यांच्या हातातील भांडे मगरीच्या जबड्यात अडकल्याने त्यांची यातून सुटका झाली व मगर परत पाण्यात गायब झाली. या प्रकारानंतर सुखवाडीच्या नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला, मात्र उशिरापर्यंत याची दखल घेतली नाही. (वार्ताहर)
डाव्या हाताचा चावा
कल्पना यांच्या शेजारी धुणे धुणाऱ्या सोनाली अर्जुन जाधव या युवतीस पाण्यामध्ये हालचाल जाणविल्याने ती पाण्याबाहेर आली. याचवेळी पाण्यात भांडे धुत असणाऱ्या कल्पना कदम यांच्यावर मगरीने हल्ला चढवून त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला.