कोल्हापुरातील महिलांचाही सांगलीत गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:16 AM2018-09-17T00:16:37+5:302018-09-17T00:16:57+5:30

The women of Kolhapur also have a miscarriage in Sangli | कोल्हापुरातील महिलांचाही सांगलीत गर्भपात

कोल्हापुरातील महिलांचाही सांगलीत गर्भपात

Next

सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये कोल्हापुरातील दोन महिलांचा गर्भपात करून भ्रूण हत्याकांड केल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भातील कागदपत्रेही सापडली आहेत. दरम्यान, हा तपास पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वीरकर यांच्या पथकाने रविवारी दुपारी या रुग्णालयावर छापा टाकून दोन तास झडती घेतली. यामध्ये गर्भपाताची औषधे, इंजेक्शन साठा व महत्त्वाची कागदपत्रे सापडली. याप्रकरणी दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
गणेशनगरमधील पाचव्या गल्लीत चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात करून भ्रूणहत्या केली जात असल्याची माहिती मिळताच, शनिवारी महापालिकेच्या आरोग्य पथकाने छापा टाकला होता. रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सात महिलांचा गर्भपात केल्याची माहिती पुढे आली होती. रुग्णालयाला सील ठोकण्यात आले होते. याप्रकरणी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. रूपाली विजयकुमार चौगुले, त्यांचे पती विजयकुमार शामराव चौगुले व सख्खा भाऊ डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात वैद्यकीय गर्भपात प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडाचे प्रकरण उघडकीस येऊन अजून दोन वर्षे पूर्ण झाली नसताना, सांगलीतही हेच प्रकरण घडल्याने याची जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गंभीर दाखल घेत हा तपास उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्याकडे सोपविला आहे.
वीरकर यांच्या पथकाने रविवारी दुपारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने रुग्णालयास ठोकलेले सील काढले. त्यानंतर छापा टाकला.रुग्णालय दोन मजली आहे. पथकाने तब्बल दोन-अडीच तास झडती घेतली. यामध्ये गर्भपातासाठी लागणाºया औषधी गोळ्या, भुलीची इंजेक्शन, गर्भपात केलेल्या महिलांचे केसपेपर, दैनंदिन कामाच्या नोंदी असलेले रजिस्टर जप्त केले. रुग्णालयाचा प्रत्येक कानाकोपरा तपासण्यात आला. पंचांसमक्ष साहित्य जप्त केले. याशिवाय छाप्याची चाहूल लागताच कर्मचाºयांनी गर्भपाताची औषधे रुग्णालयामागे जाळून टाकली होती. त्याचाही पंचनामा करण्यात आला. त्याची राख तसेच अर्धवट जळालेली औषधांची काही पाकिटे सापडल्याने तीही जप्त केली आहेत. आतापर्यंत एकूण नऊ केसपेपर सापडले आहेत. यावरून नऊ महिलांचा गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिला सांगली, कोल्हापूर व कर्नाटक राज्यातील आहेत. हा आकडा आणखी वाढू शकतो, असे उपअधीक्षक वीरकर यांनी सांगितले.
कर्मचाºयांकडे चौकशी
गर्भपातासाठी बहुचर्चित ठरलेले हे रुग्णालय अवघ्या सव्वा वर्षापूर्वी सुरू झाले होते. या रुग्णालयात दोन महिला व एक पुरुष असे तीन कर्मचारी आहेत. या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे; पण तपासाच्यादृष्टीने पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. त्यांच्या माहितीवरून पुढील तपासाला दिशा देण्यात आली आहे.

गर्भपात महिलांची चौकशी
आतापर्यंत नऊ महिलांचा गर्भपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासाच्यादृष्टीने ठोस पुरावे गोळा करण्यासाठी गर्भपात झालेल्या महिला व त्यांच्या पतींना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे उपअधीक्षक वीरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, गर्भपात झालेल्या महिलांची नावे व पत्ते आहेत. त्यांच्या चौकशीतून तपासाला मोठी मदत मिळू शकणार आहे. पोलिसांचे एक पथक यासाठी तयार ठेवण्यात आले आहे.

बंदोबस्त तैनात
गर्भपाताचे हे प्रकरण उघडकीस आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या दोन मोठ्या व्हॅन लावण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या गेटच्या आतही पोलीस तैनात केला आहे.

रूपाली चौगुले रुग्णालयातच
रुग्णालयावर छापा पडताच डॉ. रूपाली चौगुले चक्कर आल्याने कोसळल्या. त्यांच्यावर आंबेडकर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत. त्यांचे पती डॉ. विजयकुमार चौगुले हे मुंबईतून अजूनही आले नाहीत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना केले आहे. कारवाईची चाहूल लागल्याने डॉ. जमदाडे पसार झाला आहे. त्याचाही शोध घेतला जात असल्याचे उपअधीक्षक वीरकर यांनी सांगितले.

Web Title: The women of Kolhapur also have a miscarriage in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.