कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा: कुस्तीपटू पाठवणाऱ्या जिल्हा संघांवर, पंचांवर कारवाईचा इशारा

By संतोष भिसे | Published: April 25, 2023 02:13 PM2023-04-25T14:13:47+5:302023-04-25T14:14:05+5:30

कोल्हापुरातील स्पर्धा बेकायदेशीरच

Women Maharashtra Kesari Tournament in Kolhapur: Warning of action against district teams sending wrestlers, umpires | कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा: कुस्तीपटू पाठवणाऱ्या जिल्हा संघांवर, पंचांवर कारवाईचा इशारा

कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा: कुस्तीपटू पाठवणाऱ्या जिल्हा संघांवर, पंचांवर कारवाईचा इशारा

googlenewsNext

सांगली : कोल्हापुरात बुधवार ते शुक्रवारदरम्यान होत असलेली महिलामहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बेकायदेशीर आहे. स्पर्धेसाठी जिल्हा संघांनी पैलवान पाठवू नयेत. पाठवल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा कुस्तिगीर परिषदेने दिला आहे. परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी तसे पत्र सोमवारी जारी केले आहे.

कोल्हापुरात २५ ते २७ एप्रिलदरम्यान कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. खासबाग मैदानात होणारी ही स्पर्धा दीपाली भोसले चॅरीटेबल ट्रस्टने आयोजित केली आहे. महिला महाराष्ट्र केसरी ठरणाऱ्या पैलवानाला मोटार भेट देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक गटातील विजेत्याला दुचाकी दिली जाणार आहे. पण ही स्पर्धा बेकायदा आणि नियमबाह्यरित्या घेतली जात असल्याचे स्पष्टीकरण कुस्तिगीर परिषदेने केले आहे.

लांडगे यांना पत्रात म्हटले आहे की, २४ वी वरिष्ठ महिला अजिंक्यपद स्पर्धा व पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत २४ मार्चरोजी यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे कोल्हापुरातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला कोणतीही मान्यता नाही. कु्स्तिगीर परिषदेशी संलग्न जिल्हा व शहर तालीम संघांनी कोल्हापुरातील स्पर्धेत भाग घेऊ नये. पैलवान पाठवू नयेत. तसे केल्यास संबंधित संघांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

परिषदेच्या तांत्रिक अधिकारी तथा पंचांनीही कोल्हापुरातील स्पर्धेत पंच म्हणून काम करु नये. तसे केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

कोल्हापुरातील स्पर्धा बेकायदेशीरच

दरम्यान, कुस्तिगीर परिषद व कुस्ती महासंघातील वादामुळे कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात सापडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुस्तिगीर परिषदेला मान्यता दिली आहे. परिषदेने सांगलीत घेतलेलीच स्पर्धा अधिकृत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील स्पर्धा बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Women Maharashtra Kesari Tournament in Kolhapur: Warning of action against district teams sending wrestlers, umpires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.