महिलांनी पालकमंत्र्यांच्या पायावर ठेवले मूल
By admin | Published: February 6, 2016 12:06 AM2016-02-06T00:06:48+5:302016-02-06T00:08:35+5:30
जत येथील नागरिक : पुनर्वसनाच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना घेराव
सांगली : जत येथील उद्यानाच्या कामास सुरुवात करत असताना आधीपासूनच तेथे रहावयास असलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन केले नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना संतप्त महिलांनी घेराव घातला. यावेळी झालेल्या गडबडीत महिलांनी लहान बाळाला थेट पालकमंत्र्यांच्या पायावर ठेवल्याने गोंधळ उडाला. यावेळी कारवाई थांबविण्याच्या सूचना देत पुनर्वसनाचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. जत शहरात उद्यानाचे काम सुरू करण्यात आले असून, हे काम सुरू करत असताना याठिकाणी पूर्वी राहण्यास असणाऱ्या कुटुंबांची घरे हटविण्यात येत आहेत. मात्र, आमचा उद्यानास विरोध नसून, अगोदर आमचे पुनर्वसन करावे मगच काम करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पुरुष व महिला मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्या होत्या. नियोजन समितीची बैठक संपवून पालकमंत्री पाटील हे वाहनाजवळ येताच या महिलांनी घेराव घालत मागण्या मांडल्या. या गडबडीत काही महिलांनी लहान मुलाला थेट पालकमंत्र्यांच्या पायावरच ठेवल्याने गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केले. यावेळी पालकमंत्र्यांनी कारवाई थांबविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा निघून गेला. कुटुंबांचे अन्य जागेत पुनर्वसन केल्याशिवाय उद्यानाचे काम सुरू करू नये तसेच पालकमंत्र्यांचे जत तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच घेराव घातल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी जत तालुक्याला भेट देण्याची विनंती करणारे निवेदन अॅड. प्रभाकर जाधव व इतरांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. यावर लवकरच जत तालुक्याचा दौरा करून समस्या जाणून घेणार असून, प्रसंगी जतमध्ये मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बसवराज पाटील, चंद्रशेखर रेबगोंड, दिनेश साळुंखे, प्रवीण यादव, अजित पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)