सांगलीत महिलांचा चंद्र नमस्काराचा नवा विक्रम, तरूण भारत मंडळ-ॲबसुल्युट फिटनेसचे आयोजन
By घनशाम नवाथे | Updated: February 10, 2025 02:42 IST2025-02-10T02:42:10+5:302025-02-10T02:42:44+5:30
सात वाजून २० मिनिटांनी संगिताच्या तालावर चंद्र नमस्कारास प्रारंभ झाला. १२०० महिलांनी शिस्तबद्धपणे एकेक स्टेप्स सादर करण्यास सुरूवात केली. हा विक्रम पाहण्यासाठी गॅलरीत हजारो प्रेक्षक होते. त्यांनी कॅमेरे उंचावून विहंगम दृष्य टिपले...

सांगलीत महिलांचा चंद्र नमस्काराचा नवा विक्रम, तरूण भारत मंडळ-ॲबसुल्युट फिटनेसचे आयोजन
सांगली : निरभ्र आकाशात पूर्ण चंद्र डोकावला होता. आजूबाजूला चांदण्यांची चमचम सुरू होती. चंद्र आणि चांदण्यांसह हजारो प्रेक्षकांना साक्षीला ठेवत शांत धीरगंभीर संगीताच्या तालावर १२०० महिलांची चंद्र नमस्कारास सायंकाळी सात वाजून २० मिनिटांनी प्रारंभ केला. २३ मिनिटांनी उपक्रम पूर्ण होताच, टाळ्यांचा कडकडाट झाला. पाचच मिनिटांनी एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवल्याचे जाहीर करताच फटाक्यांच्या आतषबाजीत परिसर उजळून गेला.
शताब्दीकडे वाटचाल करणारे तरूण भारत व्यायाम मंडळ आणि ॲबसुल्युट फिटनेस सेंटरतर्फे महिलांसाठी आरोग्यदायी असलेल्या सामुहिक चंद्र नमस्कार उपक्रमाचे तरूण भारतच्या क्रीडांगणावर रविवारी सायंकाळी आयोजन केले होते. पद्मश्री, अर्जुन पुरस्कारप्राप्त मुरलीकांत पेटकर, जिल्हा मुद्रांक अधिकारी अश्विनी जिरंगे, व्यापारी मनोहर सारडा, जीएसटीचे सुनिल कानुगडे, तरूण भारत मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, ॲबसुल्युट फिटनेसच्या अर्चना कुलकर्णी, नामदेव घिरडे, ऐश्वर्या साळवी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उपक्रमास सुरूवात झाली. एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक डॉ. मनोज तत्वादी आणि सहकारी उपस्थित होते.
सात वाजून २० मिनिटांनी संगिताच्या तालावर चंद्र नमस्कारास प्रारंभ झाला. १२०० महिलांनी शिस्तबद्धपणे एकेक स्टेप्स सादर करण्यास सुरूवात केली. हा विक्रम पाहण्यासाठी गॅलरीत हजारो प्रेक्षक होते. त्यांनी कॅमेरे उंचावून विहंगम दृष्य टिपले. २३ मिनिटानंतर योगाची आवर्तने पूर्ण झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. पाच मिनिटांनी डॉ. तत्वादी यांनी दोन्ही रेकॉर्ड बुकमध्ये हा विक्रम नोंदवला गेल्याचे सांगितले. तसेच या आरोग्यदायी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील व ॲबसुल्युटच्या अर्चना कुलकर्णी यांना मानचिन्ह देऊन सन्मानित केले.