महिलांनी माेकळेपणाने व्यक्त व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:51+5:302021-03-10T04:27:51+5:30
कवठेमहांकाळ : महिलांच्या स्वातंत्र्यासाठी १९०८ सालापासून सुरू झालेल्या चळवळीमुळे महिलांमध्ये आज आत्मभान आलेले दिसून येते. त्यामुळे महिलांनी वर्तमानामध्ये जगताना ...
कवठेमहांकाळ : महिलांच्या स्वातंत्र्यासाठी १९०८ सालापासून सुरू झालेल्या चळवळीमुळे महिलांमध्ये आज आत्मभान आलेले दिसून येते. त्यामुळे महिलांनी वर्तमानामध्ये जगताना येणारे वेगवेगळे अनुभव मोकळेपणाने व्यक्त केले पाहिजेत, तरच आपल्या जीवनातील वास्तव समाजासमोर येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री व लेखिका डाॅ. कीर्ती मुळीक यांनी केले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग-हरोली येथील अभिव्यक्ती प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन निमंत्रितांच्या कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.
अभिव्यक्ती प्रतिष्ठान देशिंग-हरोलीमार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास कवयित्री काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी कवयित्रींच्या कवितांचा आढावा मुळीक यांनी आपल्या भाषणात घेतला. तसेच समकालीन मराठी कवितेबद्दल विचार व्यक्त केले.
संमेलनामध्ये कवयित्री डॉ. स्वाती शिंदे-पवार, डॉ. भारती पाटील, प्रतिभा जगदाळे, अस्मिता इनामदार, निर्मला लोंढे, सुषमा डांगे, वंदना हुलबत्ते, सुरेखा कांबळे, अर्चना लाड, ताई गवळी, अश्विनी कुलकर्णी, सारिका पाटील, जस्मिन शेख, योगिता काळे, मनीषा पाटील, धनश्री खाडे, आराधना गुरव या कवयित्री सहभागी झाल्या हाेत्या. मनीषा पाटील यांनी स्वागत केले. मनीषा रायजादे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सीमा निकम यांनी आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सीमा निकम, कार्याध्यक्ष सर्जेराव पाटील, सचिव ॲड. पृथ्वीराज पाटील, आबासाहेब पाटील, दयासागर बन्ने, प्रदीप पाटील, गौतमीपुत्र कांबळे, संतोष काळे, सुधाकर इनामदार, समाधान पोरे आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.