महिलांनी सर्वच क्षेत्रांत भरारी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:54+5:302021-03-17T04:27:54+5:30
ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मालन मोहिते यांच्या हस्ते महिला कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला. ...
ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मालन मोहिते यांच्या हस्ते महिला कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुवर्णाताई महिंद, शोभा होनमाने, डॉ. स्नेहल शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
विटा : महिलांनी चूल आणि मूल यातच न राहता सामाजिक, राजकीय क्षेत्रात सहभागी व्हावे. महिला आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला सरपंचापासून ते पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य, खासदार, मंत्री म्हणून आज महिला काम करत आहेत. त्यामुळे महिलांनी अशीच आपल्या स्वबळावर सर्वच क्षेत्रात भरारी घ्यावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते यांनी केले.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून उत्कृष्ट काम केल्याबद्दल अंगणवाडी सेविका, आशा वर्कस, मदतनीस, आरोग्य सेविका या महिला कोविड याेद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन मोहिते यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई महिंद, डॉ. स्नेहल शिंदे, माजी सभापती शोभाताई होनमाने, गुंजनाताई मिसाळ, शबाना आगा उपस्थित होत्या.
माजी सभापती शोभाताई होनमाने यांनी स्वागत केले. त्यानंतर कोविड याेद्ध्या महिलांनी आपले कोरोना काळातील कामाचा अनुभव सांगितला. या कार्यक्रमास देवराष्ट्रे व परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.