मुलींच्या तस्करीतील महिलेस सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:28 PM2019-05-03T16:28:11+5:302019-05-03T16:28:58+5:30
वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा सौदा करणाऱ्या जुलेखाबी हसनसाब मुजावर (वय ६०, रा. वैभवनगर, चर्चजवळ, बेळगाव) हिला दोषी धरुन चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्रन्यायाधीश ए. एन. पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
सांगली : वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा सौदा करणाऱ्या जुलेखाबी हसनसाब मुजावर (वय ६०, रा. वैभवनगर, चर्चजवळ, बेळगाव) हिला दोषी धरुन चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्रन्यायाधीश ए. एन. पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
गोकाक (जि. बेळगाव) येथील इंडियन रेस्क्यू मिशन या समाजसेवी संस्थेचे जेम्स वर्गीस यांना जुलेखाबी मुजावर ही वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी करते. अनेकदा या मुलींची ती विक्रीही करते, अशी माहिती मिळाली होती. ज्या मुलींची घरची परिस्थिती गरीब आहे, अशा मुलींना जाळ्यात ओढून ती सांगलीत व्यवसायासाठी विकत असे.
जेम्स वर्गीस यांनी ही माहिती तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांना सांगितली. बावचे यांच्या पथकाने जेम्स वर्गीस यांच्या मदतीने मुजावर हिच्याशी संपर्क साधून मुली पाहिजे, असे सांगितले. मुजावर यांनी वर्गीस यांना बेळगावला बोलाविले. त्यानुसार ते पोलीस घेऊन तिला भेटण्यास गेले. मुजावर हिने दोन अल्पवयीन मुली दाखविल्या. एका मुलीचे २० हजार व कमिशन ४० हजार रुपये, असे एकूण ६० हजार रुपये देण्याची मागणी केली. पथकाने सौदा मान्य असल्याचे सांगितले.
पथकाने तिला सात हजार रुपये इसारत रक्कम देऊन मुलींना सांगलीत घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार दुसºयादिवशी मुजावर मुलींना घेऊन सांगलीत आली. काँग्रेस भवनजवळील हॉटेल पंचरत्नजवळ तिला बोलाविले. पथकाने तिला घेऊन येण्यासाठी गाडीही पाठविली होती.
ती मुलींना घेऊन आल्यानंतर पथकाने ३० हजार रुपये दिले. पैसे मोजत असताना तिला पकडले. तिच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात आली होती.
१४ जून २०१६ रोजी ही कारवाई केली होती. तिच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक शिल्पा यमगेकर यांनी तपास केला होता.