आमदार साहेब..ओवाळणी नको जुनी पेन्शन द्या; रक्षाबंधन दिनी महिला शिक्षिकांचे अनोखे आंदोलन
By अशोक डोंबाळे | Published: August 30, 2023 05:40 PM2023-08-30T17:40:01+5:302023-08-30T17:40:28+5:30
आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून शासनाकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन
सांगली : जिल्ह्यातील महिला शिक्षिकांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करीत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना बुधवारी रक्षाबंधन दिनानिमित्त राखी बांधून ओवाळणी नको आमदार साहेब, जुनी पेन्शन लागू करा, अशी मागणी केली. गाडगीळ यांनीही बहिणींना सन्मानाची वागणूक देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जुनी पेन्शन लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे 'जुन्या पेन्शनसाठी राखी' या उपक्रम अंतर्गत सांगली जिल्हा महिला कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनानिमित्त सुधीर गाडगीळ यांना राखी बांधून ओवाळणी नको, राज्यातील दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून, लाखो शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करावे, अशी मागणी केली.
या उपक्रमात महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटन महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार, सरचिटणीस नूतन परिट, मिरज तालुका महिला संघटक शीतल भोसले, प्रीती कांबळे, सविता जाधव, त्रिशाला पडघन, सरिता पाटील, शुभांगी पाटील, योगिता अथनीकर, स्वाती चौगुले, माया गायकवाड, स्नेहा मंडल, उषा पवार, विद्या मोरे सहभागी होत्या. आमदार गाडगीळ यांनीही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांना टपालाद्वारे पाठविल्या राख्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व महिला शिक्षिका आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी टपालाद्वारे राख्या पाठवून जुनी पेन्शन योजना लागू करून भविष्य सुरक्षित करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती जुनी पेन्शन संघटन महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार यांनी दिली.