ग्रामपंचायत निवडणुका महिला सक्षमपणे लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:22 AM2020-12-26T04:22:34+5:302020-12-26T04:22:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका महिला काँग्रेस सक्षमपणे लढणार आहे. गावा-गावात मदत केंद्रे उभारून महिला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका महिला काँग्रेस सक्षमपणे लढणार आहे. गावा-गावात मदत केंद्रे उभारून महिला सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाध्यक्षा ॲड. मनीषा रोटे यांनी सांगितले.
सांगलीत महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली, यावेळी ॲड. रोटे बोलत होत्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील उपस्थित होत्या. बैठकीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबरोबरच तालुका कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
रोटे म्हणाल्या, महिला काँग्रेसच्यावतीने गावा-गावात मदत केंद्रे उभी करून कॅडर तयार करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील १२ मदत केंद्रांचे काम सक्षमपणे सुरू आहे. प्रत्येक गावात मदत केंद्र उभे करून वेगळा आदर्श निर्माण करूया. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांनी सक्षमपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शैलजाभाभी पाटील म्हणाल्या, महिलांनी तळागाळात जाऊन लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिलांना मैत्रीण समजून काम करणे गरजेचे आहे.
यावेळी रंजना माळी, श्वेता बिरनाळे, रोहिणी शिंदे, अंजू तोरण, संजीवनी पवार, राजश्री पाटील, सरोजा पाटील, रुक्मिणी अंबर उपस्थित होत्या.