इंधन व महागाईविरोधात महिला काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:09+5:302021-07-10T04:19:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, महागाईविरोधात शुक्रवारी महिला काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. यावेळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, महागाईविरोधात शुक्रवारी महिला काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारविरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीविरोधी सह्यांची मोहीमही हाती घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना केंद्र सरकारने भरमसाठ कर लावून जनतेची लूट केली. मागील ७ वर्षात तब्बल २२ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. करांशिवाय पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे लीटर आणि डिझेल ३३ रुपये ४६ पैसे लीटर आहे. गॅस सिलिंडरही ८५० रुपयांवर गेला आहे. उज्ज्वला योजनेतील लोकांना आता महाग सिलिंडर घेणे परवडत नाही. खाद्यतेल, डाळींचे भावही भडकले आहेत.
यावेळी मालन मोहिते, नगरसेविका शुभांगी साळुंखे, आरती वळवडे, मदिना बारुदवाले, शैलजा पाटील पद्माळेकर, आशा पाटील, क्रांती कदम, अर्चना शेंडगे, मायाताई आरगे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, करुणा सॅमसन, आरती गुरव, अर्चना कबाडे, सविता आबदारे उपस्थित होत्या.