मणिपूर महिला अत्याचार निषेधार्थ सांगलीत महिलांचा मोर्चा
By शीतल पाटील | Published: July 24, 2023 09:03 PM2023-07-24T21:03:15+5:302023-07-24T21:03:26+5:30
केंद्र व मणिपूर शासनाचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सांगली : मणिपूरमध्ये समाजकंटकांनी महिलांची विवस्त्र धिंड काढून सामुदायिक बलात्काराचे घृणास्पद कृत्य केले आहे. तीन महिने उलटूनही केंद्रातले मोदी सरकार व मणिपूर राज्य सरकार मुग गिळून गप्प आहे. याच्या निषेधार्थ सांगलीत सर्व पक्ष, संघटना व महिला आघाडया रस्त्यावर उतलल्या होत्या. महिलांनी काळया फिती बांधून केंद्र व मणिपूर राज्य सरकारचा निषेध केला.
कॉग्रेस भवनपासून स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळयापर्यंत महिलांनी मोर्चा काढला. शहर जिल्हा कॉग्रेस, कॉग्रेस महिला आघाडी, राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडी, शिवसेना ठाकरे गट, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, जिजाऊ ब्रिगेड, युवक क्रांती दल, श्रमिक महिला संघटना, घे भरारी महिला ग्रुप, घरेलु कामगार अशा विविध महिला संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी आशा पाटील म्हणाल्या, भाजप सत्तेत आल्यापासून महिलांच्याबाबतीत सगळीकडे दूषित वातावरण आहे. महिला खेळाडूंनी देशासाठी पदके आणली, त्यांनाच कुचलण्याचे काम सरकारने केले. मणिपूरविषयी मोदी सरकरला उत्तर द्यावे लागेल.लिलावती जाधव म्हणाल्या, मणिपूरमधील घटना अत्यंत चिड आणणारी आहे. देशाची जगभर निंदा झाली, त्यानंतर पंतप्रधानांना ३६ सेकंद बोलण्यासाठी जाग आली. गेले तीन महिने मणिपूरमध्ये हिंसाचार उसळलेला आहे. त्याकडे ना पंतप्रधानांनी लक्ष दिले, ना गृहमंत्र्यांचे.
प्रा. नंदा पाटील म्हणाल्या, आरएसएसची विचारसरणी महिलांच्या विरोधात असते. मणिपूर राज्यातील निसर्गसंपन्नता उद्योजक मित्रांच्या घशात घालण्यासाठी निघालेला हा भस्मासुर गडायला हवा. पृथ्वीराज पाटील म्हणाले, मणिपूर घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली. यावेळी क्रांती कदम, कीर्ती देशमुख, नूतन पवार, नगरसेविका रोहिणी पाटील, आरती वळवडे, पुष्पलता पाटील, कांचन कांबळे, मालन मोहिते, मीना शेषू, छाया जाधव, रेखा पाटील, ज्योती काटकर, तेजस्वीनी सूर्यवंशी, पद्मीनी जाधव, मानसी भोसले, शोभा पवार, अमृता सरगर, वंदना सुर्यवंशी, शकुंतला हिंगमीरे, प्रणीता पवार, गीता ठक्कर, सुमन पुजारी, संगीता शिंदे, जयश्री घोरपडे, शीतल मोरे, सुप्रिया घाटगे, सुजाता भगत, ज्योती सावंत सहभागी झाले होते.