भिलवडी पाणी योजनेचे काम ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2015 11:34 PM2015-07-01T23:34:12+5:302015-07-02T00:21:48+5:30

सीईओंच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता : फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा

The work of Bhilwadi water scheme was frozen | भिलवडी पाणी योजनेचे काम ठप्पच

भिलवडी पाणी योजनेचे काम ठप्पच

Next

शरद जाधव -भिलवडी -दोन कोटी रुपये खर्चूनही गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या भिलवडी येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम जूनअखेर पूर्ण न केल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिला होता. मात्र निष्क्रि य पदाधिकारी व ठेकेदेराने सीईओंच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने भिलवडीकरांवर ऐन पावसाळ्यातही दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.
मुदत संपून गेली तरीही पाणीपुरवठा योजनेचे कामकाज पूर्ण न झाल्याने भिलवडीकरांना अशुध्द व दूषित पाणीपुरवठा केला जातो. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेतली नाही. मात्र वारंवार नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दखल घेत, ६ मे रोजी सायंकाळी अचानक भिलवडीस भेट देऊन पंचनामा केला होता. त्यावेळी त्यांनी पिण्याच्या पाण्याची टाकी, जलशुध्दीकरण प्रकल्पास भेट दिली होती. पाण्याचे नमुने पाहिल्यानंतर त्यांनी, हे पाणी जनावरांना पिण्यालायक नाही, मग माणसांना कसे पिण्यास देता? अशा शब्दात ग्रामसेवक व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. दोन कोटी रुपये खर्चून नव्याने सुरू केलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम का रेंगाळले आहे, याची तपशीलवार माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. जून महिन्यापर्यंत ही योजना पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदारांचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल, तसेच ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी उपस्थित असणारे भिलवडीचे सरपंच, ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जूनअखेर नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यास देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र नेहमीच झोपेचे सोंग घेतलेल्या पधाधिकाऱ्यांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ अशाच पध्दतीने हात वर केले.
नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीमध्येही काही सदस्यांनी याबाबत विचारणा केली असता, सरपंच व ग्रामसेवकांनी या विषयाला बगल दिली. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अशुध्द व गढूळ पाण्याचा थेट पुरवठा केला जातो. यामुळे विविध साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची भीती आहे.
शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची येऊ घातलेल्या निवडणुकीत विरोधक व नागरिक कोंडी करण्याच्या तयारीला लागले आहेत.

सोनेरी टोळीवर फौजदारी करा
जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भिलवडीतील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या टोळीला हाताशी धरून कोणत्याही कामाचे मूल्यमापन न करता परस्पर लाखो रुपयांची बिले खर्ची टाकून पैशाची उधळपट्टी केली असल्याने ही योजना रेंगाळली असल्याचे सत्य उजेडात आले आहे. एकूण कामाच्या रकमेच्या तीस ते पस्तीस टक्क्यांपेक्षा जादा रकमेचा भ्रष्टाचार झाल्याने निधी अपुरा पडल्याने कामकाज रेंगाळत आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर सीईओंनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. गेल्या दोन महिन्यात ही योजना पूर्ण करण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत, अशीही माहिती समोर आली आहे. पण याचे सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांना कोणालाच सोयरसुतक नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. मात्र नेहमीच झोपेचे सोंग घेतलेल्या पधाधिकाऱ्यांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ अशाच पध्दतीने हात वर केले आहेत.

Web Title: The work of Bhilwadi water scheme was frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.