शिराळे खुर्द कालव्यावरील पुलाचे काम तातडीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:47+5:302021-06-19T04:18:47+5:30
फोटो - शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : ...
फोटो - शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथील पुलाचा कठडा कोसळल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच शुक्रवारी तातडीने पुलाच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले.
शिराळे खुर्द येथे वारणा डावा कालव्यावर असलेला संरक्षक कठडा गुरुवारी पहिल्याच पावसात तुटून भराव्यासह कालव्यात वाहून गेला. त्यासंबंधीची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. येथील कामाची पडझड झाल्याने याचा नागरिकांना धोका निर्माण झाला होता. ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने तातडीने संबंधित ठेकेदाराला सांगून नव्याने कामाला सुरुवात केली.
या ठिकाणी पुन्हा कठडा बांधून, भराव टाकून मजबूत काम करू असे ठेकेदाराने सांगितले. शुक्रवारी नव्याने खुदाई करून काम सुरू करण्यात आले. या पुलावरून अवजड वाहतूक होणार आहे. त्यामुळे येथे मजबूत कठडे, दगडी भराव व पावसाच्या पाण्याची योग्य सोय करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जर येथील काम योग्य पद्धतीने झाले तर ग्रामस्थांची समस्या सुटणार आहे. बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल ग्रामस्थांनी ’लोकमत’चे अभिनंदन केले.