मुख्याध्यापकांचे काळ्या फिती लावून काम
By admin | Published: January 6, 2015 11:32 PM2015-01-06T23:32:39+5:302015-01-08T00:06:14+5:30
केंद्र शासनाच्या आऱ टी़ ई़ कायद्याची राज्य सरकारने शंभर टक्के अंमलबजावणी केली आहे़
सांगली : राज्याने केंद्राच्या धर्तीवर जसाच्या तसा आर.टी. ई. कायदा राबविल्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची टीका करत हा कायदा त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांनी आज (मंगळवारी) काळ्या फिती लावून आंदोलन केले़ मागण्या मान्य होईपर्यंत शासकीय सर्व प्रशिक्षणावर बहिष्कार घालणार असल्याचे शिक्षक परिषदेचे नेते माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी सांगितले़
केंद्र शासनाच्या आऱ टी़ ई़ कायद्याची राज्य सरकारने शंभर टक्के अंमलबजावणी केली आहे़ या निर्णयामुळे काही फायदे झाले असले तरी, अनेक तोटेही झाले आहेत़ या निर्णयाविरोधात शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे़ शिक्षक परिषदेचे नेते साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनीही आजपासून आंदोलन सुरू केले आहे़ जिल्ह्यातील ५५० माध्यमिक शाळांपैकी ४५० शाळांमध्ये काळ्या फिती लावून शिक्षक, मुख्याध्यापकांनी काम केले़ बुधवार, दि़ ७ पासून शासनाच्या सर्व प्रशिक्षणावर बहिष्कार घालण्यात येणार आहे़ जोपर्यंत आऱ टी़ ई़ कायद्यात दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले़
ते म्हणाले की, सर्व शैक्षणिक संघटनांना बरोबर घेऊन राज्य सरकारने कर्नाटक, गुजरात राज्याप्रमाणे कायदा दुरूस्त करावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे़ नव्या सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे़ पहिल्या टप्प्यातील आंदोलन संपले आहे़ सरकारने उपाययोजना न केल्यास १३ रोजी सामुदायिक रजा आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. त्यातूनही विचार न झाल्यास २ पासून बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. बजरंग शिंदे, अर्जुन सावंत, बाळासाहेब चोपडे, राजेंद्र नागरगोजे, आर. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास मोहन लाड, बाळासाहेब कणके, अजित चव्हाण सहभागी झाले होते़ (वार्ताहर)