शेट्टींची ‘व्होट बँक’ राखण्यासाठी कसरत : अमृत योजनेचे राजकारण नव्या वळणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:21 PM2018-05-24T23:21:32+5:302018-05-24T23:21:32+5:30
इस्लामपूर : इचलकरंजीतील अमृत योजनेसाठी वारणा नदीतून पाणी उचलण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र
अशोक पाटील ।
इस्लामपूर : इचलकरंजीतील अमृत योजनेसाठी वारणा नदीतून पाणी उचलण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘इचलकरंजीला पाणी देताना वारणाकाठावर अन्याय होऊ देणार नाही’ असे वक्तव्य करुन शेतकºयांची ‘व्होट बँक’ शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजीला हे पाणी मिळणार असल्याने, त्यांनी योजनेला उघड विरोध करणे टाळले आहे.
वारणेचे पाणी इचलकरंजीला नेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे ही योजना होऊ देणार नसल्याची भूमिका शेकापचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील, वाळवा पंचायत समितीचे विरोधी गटनेते राहुल महाडिक, वारणा काठावरील गावांनी घेतली आहे. त्यासाठी पक्षविरहित वारणा बचाव कृती समिती स्थापन केली आहे.
राजू शेट्टी यांनी नुकताच वाळवा तालुक्यात दौरा केला. कणेगाव येथे शेतकºयांनी अमृत योजनेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी खा. शेट्टी यांनी स्वत:च्या मतपेढीचा विचार करून इचलकरंजीकरांना दुखवायचे नाही आणि वाळव्यातील शेतकºयांचा रोषही पत्करायचा नाही, या भूमिकेतून सामंजस्याने तोडगा काढू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची समजूत काढली व वेळ मारून नेली.
वारणा खोºयातील जिरायती जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. वसंतदादांनी चांदोली येथे धरण होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु सांगली जिल्ह्यातील शेवटच्या दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी खुजगाव येथे धरण व्हावे म्हणून राजारामबापूंनी आग्रह धरला होता. या दोघांचा वाद साºया महाराष्ट्राला ज्ञात होता. शेवटी वारणा नदीवर चांदोली येथे धरण झाले. त्या वादाचे पडसाद अजून उमटत आहेत.
खा. राजू शेट्टी जनसामान्य आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. एकीकडे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर या योजनेमुळे शेतकºयांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही. हे दोन्ही प्रश्न शेट्टी यांच्या जिव्हाळ्याचे बनले आहेत. त्यामुळे त्यांनी इचलकरंजी व वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.
- राहुल महाडिक, विरोधी गट नेते, वाळवा पंचायत समिती.