महापालिकेच्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:18+5:302021-04-22T04:28:18+5:30

सांगली : महापालिकेच्यावतीने कोरोना रुग्णांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या शनिवारी हे कोविड सेंटर सुरू ...

The work of Municipal Kovid Center is in the final stage | महापालिकेच्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात

महापालिकेच्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात

Next

सांगली : महापालिकेच्यावतीने कोरोना रुग्णांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या शनिवारी हे कोविड सेंटर सुरू होणार आहे. या सेंटरमध्ये १२४ ऑक्सिजन बेडची सुविधा असून, रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महापालिकेने अंकली रस्त्यावरील आदिसागर मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभारले होते. अवघ्या सात दिवसांत १२० बेडचे सेंटर सुरू करण्यात आले. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. या सेंटरसाठी अनेक दानशूर व्यक्तींनीही मदतीचा हात दिला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आले. आता पुन्हा महापालिका क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दररोज २०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी हे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात महापालिकेचे कोविड सेंटर उभे रहात आहे. गेल्या तीन दिवसांपासून या कामाला सुरुवात झाली. आणखी दोन दिवसांत हे सेंटर रुग्णसेवेसाठी सज्ज होईल. या सेंटरमध्ये १२४ ऑक्सिजन बेड आहेत. भविष्यात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास या बेडची संख्या २०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. याशिवाय तज्ज्ञ डाॅक्टर, परिचारिका, लॅब, एक्स रे तंत्रज्ञ, फिजिशिअनची नियुक्ती करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये रुग्णांना मोफत जेवण, औषधोपचार दिले जाणार आहे. उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, उपअभियंता वैभव वाघमारे, डाॅ. सुनील आंबोळे, डाॅ. रवींद्र ताटे यांच्यासह महापालिकेची संपूर्ण टीम कोविड सेंटरच्या उभारणीसाठी परिश्रम घेत आहे. आता शनिवार, दि. २४ रोजी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन होणार आहे.

कोट

गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. या काळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोविड सेंटर उभारण्यात आले. ८०० हून अधिक रुग्णांवर मोफत उपचार झाले. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मिरजेतील तंत्रनिकेतनमध्ये कोविड सेंटर सुरू करीत आहोत. रुग्णांना मोफत उपचार देण्याचा प्रयत्न आहे.

- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका

Web Title: The work of Municipal Kovid Center is in the final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.